पुणे । Pune
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि निर्घृण हत्या प्रकरणात आज न्यायदेवतेने ऐतिहासिक आणि कठोर न्याय दिला आहे. पुण्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी ६५ वर्षीय नराधम भीमराव प्रभाकर कांबळे याला मरेपर्यंत फाशीची (Death Penalty) शिक्षा सुनावली आहे. गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन महिन्यांच्या आत सुनावणी पूर्ण करून अंतिम निकाल देणारा हा महाराष्ट्राच्या न्यायालयीन इतिहासातील आजवरचा सर्वात जलद गतीने निकाली लागलेला पहिलाच खटला ठरला आहे.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी हा खटला ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ (Rarest of Rare) असल्याचे स्पष्ट करत आरोपीवर अत्यंत कडक शब्दांत ओढले. शिक्षा सुनावताना न्यायालयाने नमूद केले की, “आरोपीने त्या निष्पाप चिमुकलीला जिवंत राहण्याचा कुठलाही पर्याय सोडला नाही. शवविच्छेदनातून लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले असून, हत्येनंतरही आरोपीने कृत्य सुरूच ठेवले होते, जे क्रूरतेची पराकाष्ठा दाखवते. आरोपीचे वय ६५ वर्षे असले तरी त्याचे कृत्य अमानुष आहे आणि त्याने सुधारण्याची सर्व पातळी ओलांडली आहे. त्यामुळे हा आरोपी केवळ आणि केवळ फाशीच्या शिक्षेस पात्र आहे.”
न्यायालयाने गुरुवारीच भीमराव कांबळे याला पोक्सो (POCSO) आणि भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली दोषी ठरवले होते. त्यानंतर आज शिक्षेच्या तीव्रतेवर अंतिम सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात बाजू मांडताना आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्याची आग्रही मागणी केली.
मागील सुनावणी दरम्यान न्यायालयाने आरोपीला स्वतः विचारले होते की, “तूच सांग, तुला काय शिक्षा द्यायला हवी?” त्यावर सुरुवातीला मौन बाळगणाऱ्या आरोपीने आज न्यायालयात खोटी कहाणी सांगत बचावाचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाने त्याचा बनाव फेटाळून लावला. आरोपीमध्ये सुधारण्याची कोणतीही शक्यता उरलेली नाही, हा सरकारी पक्षाचा युक्तिवाद न्यायालयाने पूर्णपणे ग्राह्य धरला.
महाराष्ट्र दिनी, म्हणजेच १ मे २०२६ रोजी नसरापूर येथे ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले. पोलिसांनी अवघ्या १५ दिवसांत १,२०० पानांचे भक्कम दोषारोपपत्र (Chargesheet) न्यायालयात दाखल केले होते.
विशेष न्यायालयाने २१ मे पासून या प्रकरणाची दैनंदिन (Day-to-Day) सुनावणी सुरू केली. सरकारी पक्षाने अत्यंत वेगाने पीडित मुलीचे कुटुंबीय, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच, वैद्यकीय तज्ज्ञ आणि डीएनए (DNA) विश्लेषकांसह ५० हून अधिक साक्षीदारांची साक्ष नोंदवली. २० जून रोजी अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला होता. अखेर आज न्यायालयाने नराधमाला फाशीची शिक्षा सुनावत पीडित कुटुंबाला खरा न्याय दिला आहे. या निकालाचे संपूर्ण महाराष्ट्रातून स्वागत होत आहे.




