संगमनेर | Sangamner
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये अभ्यासक्रमासंदर्भाने अनेक अपेक्षा व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. त्या अपेक्षांची परीपूर्ती करणारा अभ्यासक्रम म्हणून 2026 च्या अभ्यासक्रमाकडे पाहावे लागणार आहे. अभ्यासक्रमाची पुनर्रचना करताना राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने धोरणातील स्तर रचनेप्रमाणे अभ्यासक्रम समित्यांची रचना करून अभ्यासक्रम विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे अंगणवाडी, पहिली ते बारावीपर्यंत इयत्तांचे चार गटात विभाजन करण्यात आले आहे. अर्थात विभाजन करण्यात आलेले असले, तरी अभ्यासक्रमाची एकात्म रचना कायम राहील असा विचार केलेला दिसून येत आहे.
राज्यात यावेळी शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा सूत्र पहिलीपासून लागू होईल असे मानले जात होते. सरकारने त्यादृष्टीने पावले टाकली होती, पण राजकीय आणि समाजात झालेल्या विरोधामुळे निवृत्त कुलगुरू डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. त्या समितीच्या अहवालानंतर हिंदीचे काय होणार हे ठरणार आहे. त्यामुळे सध्या तरी त्या विषयाचा अभ्यासक्रमाचा समावेश पहिलीपासून झालेला दिसून येत नाही. पहिलीपासून हिंदी येणार किंवा नाही याद्दल संदिग्धता कायम होती. मात्र यावेळीच्या अभ्यासक्रमात हिंदीचा समावेश झालेला नाही. सध्या प्राथमिक स्तरावर प्रथम भाषा मराठी व द्वितीय भाषा म्हणून इंग्रजीचा विचार करण्यात आलेला आहे. इतर विषयांचा विचार करता गणित, सभोवतालचे जग, कार्यशिक्षण, शारीरिक शिक्षण व कला शिक्षण या विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. पाचवीपासून हिंदी विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे. विषयाची रचना सध्या तरी जुन्या पध्दतीने कायम ठेवण्यात आली आहे.
अभ्यासक्रमाची रचना करताना केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या अध्ययन निष्पत्ती पुनर्रचित अभ्यासक्रमाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे सर्वच विषयांचा अभ्यासक्रमाच्या रचनेत अध्ययन-निष्पत्ती साध्यतेवर अधिक भर देण्यात आलेला आहे. त्यादृष्टीने अभ्यासक्रमाची चौकट निश्चित करताना अभ्यासक्रमाची ध्येय, अभ्यासक्रमाची क्षमता विधाने आरंभी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक ध्येय आणि क्षमतेचा विचार पाठ्यक्रमात, पाठ्यपुस्तकात प्रतिबिंबीत होण्याच्या दृष्टीने घटक, उपघटकांचा विचार करण्यात आलेला आहे. त्यासोबत अध्ययन निष्पत्ती, उपअध्ययन निष्पत्ती, अध्ययन अनुभव, अध्ययन अनुभवाची साधने, मूल्यमापनाचे निर्देश आणि अध्यापनाच्या तासिका अशी चौकट निश्चित केली आहे.
साधारण ध्येय, क्षमता या स्तरांचा विचार करून निश्चित केलेल्या आहेत. मात्र प्रत्येक इयत्ता आणि विषयांचा विचार करून अध्ययन निष्पत्ती निश्चित झालेल्या आहेत. साधारण एक अध्ययन निष्पत्ती व त्या अध्ययन निष्पत्तीच्या उपअध्ययन निष्पत्ती व त्या साध्य करण्यासाठी अनेक अध्ययन अनुभव द्यावे लागणार आहेत. त्यादृष्टीने अनेक कृती-उपक्रमांचा समावेश करावा लागणार आहे. व्यापक स्वरूपात असलेल्या अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी त्याचे छोट्या-छोट्या स्वरूपातील कृती उपअध्ययन निष्पत्तीत मांडणी केली आहे. प्रत्येक उपअध्ययन निष्पत्तीसाठी स्वतंत्रपणे अध्ययन अनुभवाची रचना करण्यात आली आहे. एका उपअध्ययन निष्पत्तीसाठी तीन-चार अध्ययन अनुभवांची मालिका विकसित करून देण्यात आली आहे.
त्यामुळे शिक्षकांना वर्गात एका अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी उपअध्ययन निष्पत्ती आणि त्यासाठी अनेक अध्ययन अनुभव देण्याची दृष्टीने प्रयत्न करावे लागणार आहेत. या अध्ययन अनुभवांचा विचार करता प्रत्येक वर्ग स्तरावर, राज्यातील विविध भौगिलिक, भाषिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विविधता व स्थानिक परीस्थिती लक्षात घेऊन अध्ययन अनुभव देता येणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रम एक असला तरी चौकटीच्या बाहेर जाऊन शिक्षकांना अनेक अनुभवांची मालिका विकसित करता येणार आहे. अभ्यासक्रमामुळे शिक्षकांना विविध अंगी दृष्टीकोन आणि अनुभवाची विविधता लक्षात घेऊन शिक्षणात आलेल्या बहुविध बुध्दिमत्तेनुसार अनुभवाची विविधता कायम राखली जाणार असल्याने, शिकणे अधिक आनंददायी होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांना विविध अनुभव दिल्यानंतर त्याचे मूल्यमापन करणे अनिवार्य आहे.त्या अनिवार्यतेचा विचार करून प्रत्येक उपनिष्पत्ती साध्यतेसाठी जे अध्ययन अनुभव देत शिक्षक वर्गात पाऊल टाकणार आहे.त्या प्रत्येक अध्ययन अनुभवाचे मूल्यमापन करणे आवश्यक असणार आहे.
त्यानुसार कोणत्या प्रकारच्या साधन तंत्राने येथील अनुभवांचे मूल्यमापन करावे याचे निर्देश देण्यात आले आहेत. यातील निर्देश पाहिले तर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनातील आठ साधने आणि साधननिहाय असलेल्या विविध तंत्राचा समावेश करण्यात आला आहे. मूल्यमापनात केवळ लेखी परीक्षेवर भर देण्यात आलेला नाही, तर त्यापलिकडे व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने पडलेले पैलू पडताळणीच्या दृष्टीने मूल्यमापनाचा विचार केलेला आहे. त्यामुळे समग्र मूल्यमापनाचा विचार येथे अधोरेखित झालेला दिसून येत आहे. विद्यार्थ्यांचा समग्र विकास साधत असताना आपल्याला ज्या विविध प्रकारचे पैलू विद्यार्थ्यांवर पाडायचे आहेत, ते पैलू खरोखर पडले आहेत की नाही पडताळून पाहिले जाणार आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तक शिकवत असताना अभ्यासक्रमाचा विचारही महत्त्वाचा ठरणार आहे. पाठ्यपुस्तक शिकवताना त्याच्या बाहेर घेऊन जाण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमाची सध्याची चौकट अधिक मदत करणारी ठरणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक घटक-उपघटकासाठी एकूण किती तासिक राखीव असणार आहेत याचेही दिशादर्शन करण्यात आले आहे. त्यामुळे एखादा अध्ययन अनुभव किती तासिकांमध्ये संपवायचा आहे हेही अधोरेखित झाले आहे.
(क्रमशः)
चौकटीतील तरी व्यापकतेची दृष्टी देणारी रचना…
अभ्यासक्रमाची रचना जरी चौकटीत निश्चित केलेली असली, तरी त्यातील अनुभवाची मांडणी करताना अधिकाधिक अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना परिसरातून द्यावेत अशी अपेक्षा आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष जे जीवन जगतो, त्यातील असलेल्या अनुभवाच्या मांडणीचा विचार अभ्यासक्रमात करण्यात आला आहे. जीवनाभिमुखता राखण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमात समग्रतेचा करण्यात आलेला विचार अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. जगणे आणि शिकणे याचा व्यापक विचार या अभ्यासक्रमात अधोरेखित झाला आहे. त्यामुळे धोरणातील अपेक्षांची प्रतिबिंब बदलत्या अभ्यासक्रमात पडलेले दिसते आहे.




