नवी दिल्ली | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे व्हाइट हाऊसच्या पत्रकारांसोबत (करस्पॉन्डंट्स डिनर) एका हॉटेलमध्ये पोहोचले असताना गोळीबार झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. गोळीबाराचा आवाज होताच डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षारक्षकांकडून तात्काळ हॉटेलमधून बाहेर नेण्यात आले. हल्लेखोराकडून सात ते आठ गोळ्या झाडण्यात आल्याचे तिथं उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, गोळीबार (Firing) करणाऱ्या संशियत आरोपीला सुरक्षारक्षकांकडून ताब्यात घेण्यात आलं असून सध्या त्याची चौकशी केली जात आहे.
या हल्ल्याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले की, “हा कार्यक्रम अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी संबंधित होता आणि सर्वांना एकत्र आणणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमाआधी सुरक्षेच्या धोक्याबाबत आमच्या टीमकडे कोणतीही माहिती नव्हती. मात्र कार्यक्रम सुरू असताना एका अज्ञात व्यक्तीने शस्त्रांसह सुरक्षारक्षकांवर हल्ला केला. त्याला आपल्या सुरक्षा यंत्रणेने वेळीच रोखले. एका सुरक्षा अधिकाऱ्याला गोळी लागली असून बुलेटप्रुफ जॅकेट परिधान केले असल्याने त्या अधिकार्याचा जीव वाचला आहे. मी या अधिकार्याशी बोललो असून सध्या त्याची प्रक्रिया स्थिर आहे.” अशी माहिती ट्रम्प यांनी दिली आहे.
पंतप्रधान मोदींनी ट्विट करत भारताची भूमिका केली स्पष्ट
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विट करत भारताची भूमिका स्पष्ट केली असून ट्रम्प यांच्या सुरक्षेबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प (Melania Trump) आणि उपराष्ट्रपती हे वॉशिंग्टन डीसीमधील घटनेनंतर सुरक्षित आहेत, हे जाणून समाधान वाटले. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. लोकशाहीत हिंसेला कोणतंही स्थान नाही आणि अशा कृत्यांचा पूर्णपणे निषेध केला पाहिजे,” असे मोदी म्हणाले.
नेमकं काय घडलं?
वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलमध्ये शनिवारी रात्रीच्या जेवणाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी अचानक मोठे आवाज झाले. सुरक्षेचा धोका ओळखून ‘सीक्रेट सर्व्हिस’च्या अधिकाऱ्यांनी तात्काळ डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांना सुरक्षित ठिकाणी हलवले. सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत एका सशस्त्र संशयित हल्लेखोराला गोळ्या घालून ठार करण्यात आले असून दुसऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.





