Sunday, June 14, 2026
Homeमुख्य बातम्याIndia Oil Stocks : भारतात इंधन आणीबाणी? केवळ २५ दिवसांचा तेलसाठा, आयात...

India Oil Stocks : भारतात इंधन आणीबाणी? केवळ २५ दिवसांचा तेलसाठा, आयात मार्ग बंद

सरकारकडून नवीन पुरवठादाराचा शोध

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा मंगळवारी चौथा दिवस असून, या संघर्षाचे पडसाद आता थेट भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सुरक्षेवर उमटू लागले आहेत. इराणने होर्मुझचा सागरी मार्ग बंद केल्यामुळे भारताचा तेलपुरवठा (India Oil Stocks) धोक्यात आला असून, देशाकडे (Country) आता केवळ २५ दिवसांचाच तेलसाठा शिल्लक असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

- Advertisement -

युद्धाच्या भडक्यात भारताची ३७ जहाजे आणि १,१०९ खलाशी अडकून पडले आहेत. होर्मुझ मार्ग बंद झाल्याने ही जहाजे मध्यभागी अडकली असून, आतापर्यंत तीन भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आहे. भारत सरकारने या नागरिकांच्या सुटकेसाठी तातडीने प्रतिसाद पथक तैनात केले आहे, मात्र युद्धभूमीवरील वाढत्या हल्ल्यांमुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत.

भारताची कच्च्या तेलाची आयात प्रामुख्याने याच सागरी मार्गावर अवलंबून आहे. आयात मार्ग बंद झाल्याने केंद्र सरकार (Central Government) आता रशिया किंवा आफ्रिकी देशांसारख्या नवीन तेलपुरवठादारांच्या शोधात आहे. जर पुढील १५-२० दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर देशात इंधनाचे दर गगनाला भिडण्याची आणि पुरवठा मर्यादित करण्याची वेळ येऊ शकते.

सर्वोच्च नेता निवडीपूर्वी इराणवर हल्ला

इराणमध्ये नवीन सर्वोच्च नेत्याच्या निवडीची प्रक्रिया सुरू असतानाच इस्रायलने असेंब्ली ऑफ एक्सपर्टस्च्या इमारतीवर भीषण हल्ला केला. ज्यावेळी इराणचे सर्वोच्च धार्मिक गुरू एकत्र आले होते त्याचवेळी हा हल्ला झाल्याने इराणच्या नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला आता चर्चा करायची आहे, पण आता खूप उशीर झाला आहे, असे खळबळजनक विधान करून तीव्र युद्धाचे संकेत दिले आहेत.

पंतप्रधान मोदींचा आठ देशांशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गेल्या ४८ तासांत कतारसह आठ देशांच्या प्रमुखांशी संवाद साधून भारतीय समुदायाची सुरक्षा आणि प्रादेशिक शांततेवर चर्चा केली. कतारवरील हल्ल्यांचा निषेध करत त्यांनी तेथील भारतीयांची काळजी घेतल्याबद्दल अमीर शेख तमीम यांचे आभार मानले तसेच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही विविध देशांशी राजनैतिक चर्चा करून भारताची भूमिका स्पष्ट केली.

युद्धभूमीत अडकलेल्यांना परत आणू – महाजन

अमेरिका-इराण युद्धामुळे आखाती देशात अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना सोडवण्यासाठी शासनाचे प्रयत्न वेगाने सुरू असून दोन ते तीन दिवसात त्यांना आणण्यात येईल. ग्रुप कॉल करून ३०० ते ४०० जणांशी संवाद साधला असून अधिकारीही त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांमध्ये काही महाराष्ट्रातील नागरिक अडकले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी शासनाने विशेष पथक नियुक्त केले आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून त्यांच्या सुरक्षिततेची माहिती घेतली जात असून भारतीय दूतावास तसेच केंद्र शासनाच्या यंत्रणांशी सातत्याने समन्वय साधला जात आहे. कोणताही नागरिक असुरक्षित राहणार नाही. त्यांना ना सुरक्षितरीत्या मायदेशी परत आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : दीड कोटींचा हस्तगत मुद्देमाल फिर्यादींना परत; परिमंडळ...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik अंबड विभाग अंतर्गत (Ambad Division of Zone) येणाऱ्या अंबड पोलीस ठाणे, इंदिरानगर पोलीस ठाणे, सातपुर पोलीस ठाणे, एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे...