नवी दिल्ली | News Delhi
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) पारदर्शकतेवर आणि कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नवी दिल्लीत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि केंद्र सरकारवर थेट शब्दांत निशाणा साधत, ज्यांनी-ज्यांनी या देशात निवडणुका चोरल्या आणि मतं चोरली, त्यांना आज ना उद्या नक्कीच शिक्षा करणारच, असा इशारा दिला.
मोदी-शाहांचे जुने व्हिडीओ दाखवून भाजपच्या विजयावर प्रश्नचिन्ह
पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे जुने व्हिडीओ दाखवून भाजपच्या निवडणूक रणनीतीवर व विजयावर थेट सवाल उपस्थित केले. यावेळी महाराष्ट्र, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा दाखला देत राहुल गांधी म्हणाले की, संपूर्ण देशात आणि या राज्यांमध्ये सरकारविरोधात स्पष्ट वातावरण (Anti-incumbency) दिसत असतानाही भाजप प्रत्येक निवडणूक कशी जिंकू शकतो? असा प्रश्न उपस्थित केला. तसेच देशातील निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता पूर्णपणे संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, निवडणूक आयोग निष्पक्षपणे काम करत नसल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
मते चोरणाऱ्यांना सोडणार नाही
राहुल गांधींनी यावेळी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा आक्रमकपणे मांडत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “देशातील लोकशाही (Democracy) टिकवण्यासाठी निवडणुका पारदर्शक होणे अत्यंत आवश्यक आहे. परंतु सध्याच्या निवडणूक आयोगाच्या कारभारावरून मतदारांच्या विश्वासाला धक्का बसला आहे. या गैरप्रकारात जे-जे सहभागी असतील आणि ज्यांनी मतांची चोरी केली आहे, त्यांना कायदा आणि जनता कधीही माफ करणार नाही; त्यांना आज ना उद्या शिक्षा होणारच, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी आणि अमित शाह या कटाचे मुख्य सूत्रधार
यावेळी राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार (Dnyanesh Kumar) हे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनीच निवडलेले अधिकारी आहेत. या संपूर्ण महाकटाचे मुख्य सूत्रधार पंतप्रधान आणि गृहमंत्रीच असून, ते ज्ञानेश कुमारांना पाठीशी घालण्याचा व वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले.



