नवी दिल्ली | New Delhi
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतरवर गेल्या ३६ दिवसांपासून सुरू असलेले ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. केंद्र सरकारसोबत पार पडलेल्या बैठकीत आंदोलकांच्या तीन प्रमुख मागण्यांवर पूर्ण सहमती झाल्यानंतर सीजेपीने हे आंदोलन मागे घेण्याची अधिकृत घोषणा केली.
कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये केंद्र सरकारचे (Central Government) प्रतिनिधी केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा व डॉ. जितेंद्र सिंह आणि सिजीपीचे नेते सौरव दास व आशुतोष रांका यांच्यात चर्चेची तिसरी फेरी पार पडली. या बैठकीनंतर त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आंदोलन समाप्तीची माहिती दिली.
यावेळी सीजेपीच्या नेत्यांनी सांगितले की, “आंदोलन (Protest) सुरू करताना आमची पहिली प्रमुख मागणी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची होती. ती मागणी सरकारने मान्य केली असून धर्मेंद्र प्रधान यांनी पद सोडले आहे. आंदोलनादरम्यान विद्यार्थी व सिजेपीच्या कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे भाजपशासित राज्यांमध्ये तात्काळ मागे घेतले जातील. तसेच भविष्यात त्यांच्यावर कोणतीही सुडबुद्धीने कारवाई केली जाणार नाही. आंदोलनात जखमी झालेल्यांना १ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याची मागणीही सरकारने स्वीकारली आहे. मंगळवारपर्यंत सरकार या सर्व मुद्द्यांवर लेखी हमीपत्र देणार आहे” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, प्रमुख मागण्या (Demand) औपचारिकरीत्या मान्य झाल्यामुळे कॉकरोच जनता पार्टीच्या नेतृत्वाने आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले असून, या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून पेटलेला हा वाद शांत झाला आहे.
केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री नड्डा यांनी सांगितले की, आंदोलकांनी सरकारसमोर मांडलेल्या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे. विविध राज्यांत दाखल झालेले एफआयआर नियमांनुसार मागे घेतले जातील. जखमी आंदोलकांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई दिली जाईल. आंदोलनकर्त्यांनी सादर केलेल्या मागण्यांच्या सनदेचा सरकार सखोल अभ्यास करेल आणि सीजेपीच्या प्रतिनिधी मंडळासोबत पुढील काळातही शैक्षणिक सुधारणांबाबत चर्चा सुरू ठेवली जाईल” असे त्यांनी म्हटले.




