नवी दिल्ली | New Delhi
गेल्या काही दिवसांपासून साखरेच्या दरात (Siugar Price Hike) सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारने (Cental Government) ग्राहकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. दोन महिन्यांत साखरेच्या दरात झालेली तब्बल ४० टक्क्यांपर्यंतची वाढ रोखण्यासाठी १० लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेच्या शुल्कमुक्त आयातीला (Import Duty Free) परवानगी देण्यात आली आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
गेल्या एका दशकात प्रथमच भारत (India) एवढ्या मोठ्या प्रमाणावर साखर आयात करणार आहे. टॅरिफ रेट कोटा (TRQ) अंतर्गत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत ही आयात केली जाईल. १० लाख मेट्रिक टन कच्च्या साखरेवर कोणतेही आयात शुल्क आकारले जाणार नाही. ३१ ऑक्टोबर २०२६ नंतर जुने शुल्क पूर्ववत लागू होईल.या कच्च्या साखरेपासून तयार होणारी शुद्ध (रिफाइन्ड) साखर केवळ देशांतर्गत बाजारातच विकणे बंधनकारक असेल. पूर्वी ही साखर निर्यातीसाठी वापरली जायची, परंतु आता पुरवठा वाढवण्यासाठी ती स्थानिक बाजारात वळवली जाईल.अग्रिम प्राधिकार (Advance Authorization) योजनेतील आयात साखरेचे ‘टीआरक्यू’मध्ये रूपांतर करताना मिळालेली जीएसटी सूट कंपन्यांना भरावी लागणार आहे.
साखर दरवाढीची मुख्य कारणे
ऑगस्टच्या सुरुवातीला किरकोळ बाजारात साखरेचे दर ४८ ते ५० रुपये प्रति किलोवर गेले, तर कोल्हापूरच्या घाऊक बाजारात दर ५,३५० रुपये प्रति क्विंटलच्या विक्रमी पातळीवर पोहोचले होते. त्यानंतर आता केंद्र सरकारने या दरवाढीमागील कारणे स्पष्ट केली आहेत. यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि हवामानातील बदलांमुळे ऊस पिकाचे झालेले नुकसान.बाजारात व्यापारी व उद्योगांतील घटकांकडून होणारी साठेबाजी आणि सट्टेबाजी आणि आगामी सणांमुळे देशांतर्गत बाजारात अचानक वाढलेली मागणी आणि जागतिक बाजारातील पुरवठा टंचाई ही साखरेचे भाव वाढण्याची प्रमुख कारणे आहेत.
साखरेच्या दरवाढीस इथेनॉल निर्मिती जबाबदार नाही; मंत्रालयाचे स्पष्टीकरण
साखरेच्या दरवाढीला इथेनॉल निर्मिती कारणीभूत असल्याचा दावा अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने फेटाळून लावला आहे. त्यांनी २०२२-२३ मध्ये साखरेच्या एकूण उत्पादनापैकी १२ टक्के साखर इथेनॉलसाठी वापरली जात होती, हे प्रमाण २०२५-२६ मध्ये घटून ९ टक्क्यांवर आले आहे.सध्या देशातील ७५ टक्के इथेनॉलची निर्मिती धान्यापासून (प्रामुख्याने मका) केली जात आहे. त्यामुळे इथेनॉलमुळे साखर महाग झाल्याचे म्हणणे चुकीचे आहे.या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा सुरळीत होऊन किमतींवर तात्काळ नियंत्रण येईल, असा विश्वास अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने व्यक्त केला आहे.




