नवी दिल्ली | New Delhi
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) हे राज्यसभेची निवडणूक लढवणार असून, आज (गुरुवारी) अर्ज भरणार आहेत. दहा राज्यांतील ३७ जागांसाठी निवडणूक आयोगाने राज्यसभेची निवडणूक (Rajyasabha Election) घोषित केली आहे. त्यासाठी आज (दि.०५) रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. नितीश कुमार बिहार विधानसभेत पोहोचून राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन हे देखील राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत.यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
नितीश कुमार यांची राज्यसभेवर वर्णी लागल्यास त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा (CM Post) द्यावा लागणार आहे. त्यामुळे भाजपकडून (BJP) संख्याबळाच्या आधारावर बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर दावा केला जाण्याची शक्यता आहे. तर नितीश यांच्या जेडीयूकडून (JDU) देखील मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला जाऊ शकतो. त्यामुळे बिहारमध्ये (Bihar) कुणाचा मुख्यमंत्री होता, हे बघणे महत्त्वाचे असणार आहे. जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर नितीश कुमार यांचे पुत्र बिहारचे उपमुख्यमंत्री (DCM) होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नितीश कुमार मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचे समजताच जेडीयूच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. हा निर्णय नितीश कुमारांचा नाही, ही गद्दारी असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांनी दिली आहे.तर जेडीयू नेते सतीश कुमार सुमन म्हणाले की अमित शहा (Amit Shah) यांनी १५ हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. एमएलसी पदासाठी करार झाला आहे. नितीश कुमार यांचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही. लल्लन सिंह, संजय झा आणि विजय चौधरी यांनी हे सर्व केले आहे,असे त्यांनी म्हटले आहे.
नितीश कुमारांनी दिली पोस्टद्वारे माहिती
मागील दोन दशकांहून अधिक काळ तुम्ही माझ्यावर तुमचा विश्वास आणि पाठिंबा सातत्याने कायम ठेवला आहे. त्याच जोरावर आम्ही बिहारची व तुम्हा सर्वांची पूर्ण निष्ठेने सेवा केली आहे. तुमच्या विश्वास आणि पाठिंब्याचीच ही ताकद होती. त्यामुळे बिहार आज विकास आणि सन्मानाचा एक नवीन आयाम सादर करत आहे. यासाठी मी यापूर्वीही अनेकदा तुमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. संसदीय जीवन सुरू केल्यापासूनच माझ्या मनात एक इच्छा होती की, मी बिहार विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांसोबतच संसदेच्या दोन्ही सभागृहांचाही सदस्य व्हावे. याच अनुषंगाने यावेळी होत असलेल्या निवडणुकीत मी राज्यसभेचा सदस्य होऊ इच्छितो. तुमच्यासोबतचे माझे हे नाते भविष्यातही असेच टिकून राहील, याचा विश्वास मला आहे. तुमच्या सोबतीने एक विकसित बिहार घडवण्याचा आमचा संकल्प पूर्वीप्रमाणेच कायम राहील. नवीन सरकार स्थापन होईल, त्यांना माझे पूर्ण सहकार्य आणि मार्गदर्शन असेल.





