
नवी दिल्ली | New Delhi
दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट परीक्षेचा (Neet Exam) पेपर फुटीच्या कारणावरून आणि पारदर्शक शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी ‘पेलेट गन’ वापरून लाठीचार्ज केला होता. त्यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर आता लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहून केंद्र सरकारला थेट दोन सवाल केले आहेत.
राहुल गांधी यांनी २० जुलै रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी गृहमंत्रालयाला (Ministry of Home Affairs) लिहिलेले पत्र आपल्या ‘X’ (ट्विटर) अकाऊंटवरही पोस्ट केले आहे. आपल्या पत्रात राहुल गांधी यांनी नमूद केले की, देशातील तरुण आणि विद्यार्थी न्यायासाठी व पारदर्शक शिक्षण व्यवस्थेसाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करत होते. मात्र, प्रशासनाने त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी सुरक्षा दलांच्या माध्यमातून त्यांच्यावर अमानुष बळप्रयोग केला. या कारवाईदरम्यान पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, लाठीचार्ज केला गेला आणि थेट ‘पेलेट गन’चा वापर करण्यात आला असे म्हणत या हिंसाचारात अनेक विद्यार्थी (Student) गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी महिला विद्यार्थ्यांनाही लक्ष्य केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी पत्रात केला आहे.
एका विद्यार्थ्याचा डोळा जाण्याची भीती; साध्या वेशातील मारहाण करणारे कोण?
पत्रात (Letter) पुढे बोलताना राहुल गांधी यांनी एका धक्कादायक घटनेचा उल्लेख केला. पेलेट गनच्या गोळीबारामुळे साहिल लोचब हा १९ वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याचा एक डोळा जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या दडपशाहीचा फटका पत्रकार आणि सामान्य नागरिकांनाही बसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच दिल्ली पोलीस आणि सुरक्षा दले ही थेट केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने, राहुल गांधींनी अमित शाह यांच्यावर थेट निशाणा साधत दोन मुख्य प्रश्न उपस्थित केले आहेत. यात गृहमंत्री म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांवर पेलेट गन आणि अमानुष बळ वापरण्यास मंजुरी दिली होती का? आणि साध्या कपड्यात विद्यार्थ्यांना काठ्यांनी मारहाण करणारे लोक नेमके पोलीस होते की गृहमंत्रालयाचे स्वयंसेवक? असे सवाल त्यांनी शहा यांना विचारले आहेत.
संवादाने प्रश्न सोडवण्याचा सल्ला
तसेच शांततापूर्ण आंदोलन हाच भारतीय लोकशाहीचा पाया आहे, असे सांगत राहुल गांधींनी तरुणांचा आवाज दडपण्याऐवजी सरकारने संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवले पाहिजेत, असा सल्ला केंद्र सरकारला दिला आहे. दरम्यान राहुल गांधींच्या या आक्रमक पत्रामुळे दिल्लीसह देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता यावर गृहमंत्रालय काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




