Sunday, October 13, 2024
HomeUncategorizedनवरंग स्त्री मनातले : रंग ममत्वांचा

नवरंग स्त्री मनातले : रंग ममत्वांचा

नवरंगांची करीत उधळण, उत्सव नवरात्रींचा सजला,

आदिशक्तीच्या भक्तीत, अवघा आसमंत नटला,

- Advertisement -

तिच्या नऊ रुपात असे,एक वेगळीच शक्ती,

नवदुर्गा मातेचीच, असे मनामनात भक्ती.

आदिशक्ती तुळजाभवानी मातेच्या कृपेने विजया दशमीच्या उत्सवात आदिशक्तीची पूजा करून नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. स्त्रियांसाठी हा उत्सव पूजा, पाठ, व्रतवैकल्य याबरोबरच स्वतःचा आनंद शोधण्याचा, तो मिळवण्याचा आणि सजण्याचा देखील असतो. याची सुरुवात होते जिथे गृहमंत्रीपद आमच्या हाती असते त्या आमच्या स्वयंपाक घरापासून. जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी निवास करते. म्हणून या नवरात्र उत्सवापूर्वी घराची स्वच्छता केली जाते. घर स्वच्छ होतं तसं आमचं मनही स्वच्छ होतं. आणि मग सुरू होते नवरात्र.

व्रतवैकल्य, उपवास, पूजा, अर्चा करून देवीचे घट बसवून अन्नपूर्णेला खुश ठेवून स्वयंपाकातही नवनवीन पदार्थ आम्ही करत असतो. याचवेळी स्वतःच्या बाबतीत कधी नव्हे ते आम्ही सतर्क असतो. नवरात्रोत्सवात गरबा, दांडिया, टिपर्‍या, हादगा, भोंडला आदी कार्यक्रम उत्साहात आयोजित केले जातात.

नवरात्रोत्सवात नवरंगांना विशेष महत्त्व दिले जाते. नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या, वस्त्र परिधान करायचे. देवीचे आवडते रंग. मग त्या रंगांची महती विषद होऊ लागते. अर्थात इथे पुन्हा आमच्या भावनांचा खेळ, बुद्धीचे मापन आणि आमची मस्करी, टीका. आम्हांलाही समजतं असं काही नसतं. पण सहजगत्या त्यातून आनंद मिळत असेल तर तो मिळवायला काय हरकत? म्हणून हे करत असतो. आज पिवळा, उद्या लाल, परवा गुलाबी हे सर्व करण्यात आनंद मिळतो.

या नवरंगाविषयी आपण बरीच माहिती ऐकली, वाचली असेल. पण आज मी आमच्या स्त्री मनातल्या नवरंगांविषयी आपल्याला सांगणार आहे. नवरात्रोत्सवातला रंग नारंगी पहिला. पावन करुनी जातो भक्तांच्या मनाला. मी अनुभवलेला स्त्री रंगातला पहिला रंग ममत्वाचा. माझ्या घरी येणार्‍या कामवाल्या लता मावशींची नात अधूनमधून त्यांच्याबरोबर माझ्या घरी येत असे. एखाद्या परीसारखी सावळी पण तरतरीत. आज नवरात्रीच्या पाहिल्याच दिवशी ती माझ्याकडे आली होती. आजीचे काम होईपर्यंत काय करायचं? असा प्रश्न तिच्या पुढे असायचा. म्हणून ती आल्यावर मी नेहमीच तिला टीव्ही लावून द्यायची. ती देखील जमिनीवर बसायची. पण एक दोनदा रागावल्यापासून ती सोफ्यावर बसू लागली.

आज ती जिथे बसली तिथे मी मला नेसण्यासाठी साडी ठेवलेली होती. ती आज त्या साडीकडेच जास्त पाहत होती. मी तिला विचारले, काय गं? आवडली का साडी? हो काकू खूप छान आहे. मग देऊ का तुझ्या आजीला नेसायला? मी मुद्दामच हसत हसत विचारले. नको नको ती तुम्हांलाच छान दिसेल! आणि मला ती तुमच्या अंगावरच पहायची आहे. मी बरं म्हणून पुन्हा माझं काम करू लागले. थोड्याच वेळात आवरून साडी नेसून हॉलमध्ये आले. तर काय आश्यर्य! ती माझ्याकडे पाहतच राहिली आणि चक्क मला मिठी मारली. आनंदाने चेकाळली आई..! मी मनातून चरकले. कारण तिला आई नव्हती. आणि क्षणात तिने मला घट्ट मिठी मारली होती. मी पुरती शहरून गेले. आणि क्षणात मीही तिला मिठीत घेऊन घट्ट पकडले आणि तिचे पापे घेतले.

दोघींच्या डोळ्यातून अश्रूंच्या रूपातून वाहणारा नवरात्रोत्सवातला हा पहिला रंग तो होता ममत्वाचा रंग!

– सौ. अनिता अनिल व्यवहारे, श्रीरामपूर

- Advertisment -

ताज्या बातम्या