अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
एकेकाळी जिल्ह्यात सर्वाधिक आमदारांसह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अव्वलस्थानी असणार्या आणि कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे असणार्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची नगर जिल्ह्यात अत्यंत बिकट स्थिती झाल्याचे चित्र आहे. राजकीय पक्षांच्या वतीने नेमण्यात येणार्या बीएलएफ (बुथ लेव्हल एजंट / बुथ प्रतिनिधी) यादीत मोठ्या पवार यांच्या गटाला जिल्ह्यातील तब्बल 9 तालुक्यांत एकही प्रतिनिधी नेमता आलेला नाही. दुसरीकडे, काँग्रेसलाही दोन तालुक्यांत एकही प्रतिनिधी मिळालेला नसल्याने महाविकास आघाडी स्थिती कठीण असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष (भाजप) सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून सर्वाधिक आमदारांसह मतदान बूथ पातळीवर सर्वाधिक बीएलए नेमण्यात भाजपने अव्वल स्थान मिळवले आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादी (अजित पवार गट) असून या पक्षाने 2,234 बीएलए नेमत दुसरे स्थान पटकावले आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 2 हजारांहून अधिक ठिकाणी बीएलए नेमत तिसरे स्थान मिळवले आहे. राष्ट्रीय पक्ष असणार्या काँग्रेसने 12 मतदारसंघांपैकी 10 मतदारसंघांत 1 हजार 761 बीएलए नेमले आहेत; मात्र पारनेर आणि श्रीगोंदा या दोन तालुक्यांत काँग्रेसला नावालाही एकही बुथ प्रतिनिधी मिळालेला नाही.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची स्थितीही चिंताजनक असून शेवगाव, नगर आणि श्रीगोंदा या तीन ठिकाणी पक्षाला एकही बीएलए नेमता आलेला नाही. तसेच शिंदे गटाच्या शिवसेनेला अकोले आणि पारनेरमध्ये एकही बीएलए मिळालेला नाही. पवार गटाची दयनीय अवस्थाजिल्ह्यात सर्वात वाईट अवस्था राष्ट्रवादी (शरद पवार गट) ची झालेली आहे. एकेकाळी सर्वात ताकदवान आणि मजबूत पक्ष संघटना असणार्या या पक्षात, निवडणूक विभागाच्या आवाहनानंतर साधे बूथ प्रतिनिधी मिळणेही अवघड झाले आहे. यावरून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची मतदारसंघनिहाय स्थिती किती आव्हानात्मक आहे, याचा अंदाज बांधणे कठीण राहिलेले नाही.
मतदारसंघांमधील बीएलए संख्याबळअहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 11 नोंदणीकृत राजकीय पक्ष असून 3 हजार 830 मतदान केंद्र (पोलिंग स्टेशन) आहेत. जिल्ह्यात विविध पक्षांमार्फत नेमण्यात आलेल्या बीएलएची मतदारसंघनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे असून यात अकोले: 912 संगमनेर: 1 हजार 172 शिर्डी: 853 कोपरगाव: 1 हजार 94 श्रीरामपूर: 1 हजार 452 नेवासा: 855 शेवगाव: 1 हजार 59 राहुरी: 885 पारनेर: 676 नगर शहर: 870 श्रीगोंदा: 735 कर्जत-जामखेड: 1 हजार 401




