नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सातपूर परिसरातील गोळीबार (Satpur Firing Case) खंडणी आणि प्राणघातक हल्ला प्रकरणातील कुख्यात पीएल ग्रुप (लोंढे टोळी) टाेळीचा म्होरक्या प्रकाश उर्फ बॉस लोंढे याला मुंबई उच्च न्यायालयाकडून (Mumbai High Court) जामीन मिळाल्यानंतर, आता त्याचा मुलगा दीपक उर्फ नाना प्रकाश लोंढे यानेही उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सत्र न्यायालयाने वडील आणि भावाचे प्रयत्न हाणून पाडले असले, तरी नानाच्या जामीन अर्जावर येत्या २९ ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे लोंढे टोळीचे उरलेले सदस्य बाहेर येणार का, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.
ऑक्टोबर २०२५ मध्ये सातपूर हद्दीत झालेल्या गोळीबाराच्या गुन्ह्यात लोंढे टोळीविरुद्ध कठोर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन सत्र न्यायालयात नियमित खटला सुरू आहे. याआधी ऑगस्ट २०२६ मध्ये नाशिक सत्र न्यायालयाने प्रकाश लोंढे (Prakash Londhe) आणि त्याचा मुलगा दीपक (नाना) यांचे जामीन अर्ज फेटाळले होते. दीपकने खंडणीतून मिळालेला काळा पैसा विविध मार्गांनी व्हाइट (कायदेशीर) करण्याचा प्रयत्न केला होता, असे न्यायालयाने स्पष्ट केले हाेते.
आता सत्र न्यायालयातून दिलासा न मिळाल्यामुळे आणि मुख्य सूत्रधार प्रकाश लोंढे १५ ऑक्टोबर रोजी कारागृहाबाहेर (Jail) आल्यानंतर, दीपकने आता मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. या अर्जावर २९ ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी होणार असल्याने उच्च न्यायालय नानाला दिलासा देते का, याबद्दल कायदेशीर वर्तृळात उत्सुकता आहे.
कुटुंबातील कायदेशीर लढाईत भर
लोंढे टोळीतीलच भूषण उर्फ भाईजी प्रकाश लोंढे यानेही जामिनासाठी नाशिक सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, गुन्ह्याचे गंभीर स्वरूप आणि टोळीतील सहभाग पाहता सत्र न्यायालयाने गुरुवारी (दि. २२) भूषणचा जामीन अर्ज फेटाळून लावला. एकीकडे दीपकने थेट हायकोर्टात मोर्चा वळवला असताना, भूषणचा अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यामुळे आता तोदेखील भावाच्या पावलावर पाऊल ठेवून उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
खटल्याची सद्यस्थिती, इतरांचे बस्तान
टोळीचा म्होरक्या प्रकाश लोंढे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार १५ ऑक्टोबर रोजी बाहेर आला असून, नुकताच तो नाशिक सत्र न्यायालयातील सुनावणीला सलग दोन दिवस हजर राहिला होता. याच गोळीबार व खंडणी प्रकरणातील संशयित बार चालक बिपिन पटेल, संतोष शेट्टी पवार उर्फ जल्लाद, शुभम गोसावी, देवेश शेरताठे, दुर्गेश वाघमारे, शुभम निकम, राहुल गायकवाड यांसह काही संशयित आधीच जामिनावर कारागृहाबाहेर आहेत.




