नाशिक | प्रतिनिधी | Nashik
अस्थमा (दमा) पूर्णपणे बरा करण्याचे आणि घरात पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवून एका महिलेची लाखो रुपयांची फसवणूक (Fraud) करणाऱ्या संशयित भोंदू बाबाने कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. याप्रकरणी गुन्हा (Case) दाखल झाल्यापासून पसार असलेला संशयित अरुण धोंडू पाटील याने नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर सोमवारी (दि. २६) सुनावणी होणार आहे.
गंगापूर पोलिसांत (Gangapur Police) दाखल झालेल्या फिर्यादीनुसार, जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणारा संशयित अरुण पाटील हा स्वतःला महाराज भासवत नागरिकांची दिशाभूल करत होता. फेब्रुवारी २०२२ पासून हा प्रकार सुरू होता. आजारी महिलेला गाडी पाठवून व डोळ्यांवर पट्टी बांधून सोमेश्वर धबधबा परिसर आणि गंगापूर शिवारातील गोदावरी नदीकाठी नेण्यात आले. तेथे अघोरी पूजेच्या नावाखाली महिलेला अर्धनग्न अवस्थेत बसवून पूजाविधी करण्यात आला.
यानंतर, कालभैरव पूजा करून आणि अघोरी विद्येने आजार बरा करण्याचे खोटे आश्वासन देऊन ५० हजार रुपये उकळले. आजारात फरक न पडल्याने आणखी रक्कम घेत घरात‘पैशांचा पाऊस’ पाडण्याचे आमिष दाखवून एकूण साडेसात लाख रुपयांची फसवणूक केली. पूजाविधीदरम्यान घटनास्थळी मानवी कवट्या आणि बोकड ठेवण्यात आले होते. पैसे देऊनही काहीच न झाल्याने विचारणा केली असता, मासिक पाळीमुळे पाऊस पडला नाही किंवा डोळ्यांची पट्टी काढली अशी अजब कारणे देत भोंदूने टाळाटाळ केली.
राजकीय कनेक्शन अन् पोलिसांचा तपास
संशयित पाटील हा स्थानिक राजकीय नेत्यांच्या जवळचा असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे. तो कायम टिळा लावून वावरत असे आणि जमीन खरेदी-विक्रीच्या नावाखाली बऱ्याच जणांना फसवत असे. या भोंदूने आणखी काही जणांना गंडा घातला आहे का, याचा कसून तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जमीर शेख करत आहेत.




