शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
पक्षाला मिळालेल्या विजयाने हुरळून न जाता जमीनीवर पाय ठेवून काम करा, असे आवाहन करतानाच भविष्यात विचारांची, संघटनेची दिशा ठरवावी लागणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिले. 2047 पर्यंत पक्ष बलवान करण्याची जबाबदारी आपली असून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष एकसंघ करत बळकट संघटना बांधायची आहे, असे आवाहन त्यांनी केले. शिबिरात सदस्य नोंदणीचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे आदींच्या हस्ते करण्यात आला. शिबिराची सुरुवात पक्षाचे झेंडावंदन करुन करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पहिल्या दिवशी झालेल्या नवसंकल्प शिबिरात ‘राज्याची राजकीय सद्यस्थिती व वेध भविष्याचा’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार संदीप चव्हाण, माजी मंत्री सुबोध मोहिते, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे तर ‘वाढते नागरीकरण आणि पक्ष बांधणीचे आव्हान’ या विषयावर नजीब मुल्ला, राजलक्ष्मी भोसले यांनी विचार मांडले. महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्यासह विभागवार जिल्हाध्यक्षांनी आपले विचार मांडले. ‘महिला सक्षमीकरणात राष्ट्रवादीचे योगदान’ या विषयावर अदिती तटकरे, ‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका आणि पक्ष बांधणी’ यावर ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी तर ‘कृषी क्षेत्राचे धोरण’ यावर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, ‘राज्याच्या विकासात आदिवासी समाजाचे महत्त्व आणि योगदान’ याविषयावर मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विचार मांडले.
प्रफुल्ल पटेल म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला कसे सामोरे जायचे व पक्षाचे ध्येय धोरणे समजून सांगणे गरजेचे असल्याने हे चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाच्या विचारसरणीस जोडले गेलेले अनेक नेत्यांनी मागील निवडणुकीत काही वेगळे भूमिका घेतल्या होत्या. मात्र पुन्हा पक्षात येणार्यांचे स्वागत आहे. छगन भुजबळ हे नाराज नाहीत. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही सगळे मिळून पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करत आहोत. आगामी निवडणुकांमध्ये स्थानिक परिस्थितीचा आढावा तसेच कार्यकर्त्यांचा विचार घेऊन महायुती ठेवायची की स्वतंत्र लढाईचे हे निर्णय स्थानिक पातळीवर घेतले जातील.
दिलीप वळसे पाटील म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील पक्षांशी आघाडी झाली तर ठिक अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढायला देखील तयार आहे. शिबिरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर आम्ही निवडणुकीची रणनीति ठरवणार आहोत. बीड प्रकरणांमध्ये जो कोणी दोषी असेल त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई झाली पाहिजे, अशी आमची पहिल्यापासून भूमिका आहे. न्यायालय दोषी की निर्दोष हे ठरवते. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत माझ्यापर्यंत काही माहिती आलेली नाही. इथे मंत्री मुंडे यांच्याबाबतीत फक्त आरोप होत आहेत. नुसत्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. प्रकरणाचा शोध लागला पाहिजे आणि दोषींना शिक्षाही झाली पाहिजे. पण जोपर्यंत एखादा व्यक्ती दोषी सिद्ध होत नाही, तोपर्यंत त्याच्यावर आरोप करणे योग्य नाही. अजित पवारांनी देखील याबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत काही आढळल्यास पक्ष नेतृत्व भूमिका घेईल.
नवसंकल्प शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, ज्येष्ठ नेते नवाब मलिक, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार सुनेत्रा पवार, मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री मकरंद पाटील, मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री अदिती तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश आदिक, अभिनेते सयाजी शिंदे, मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आदींसह पक्षाचे विद्यमान आमदार, खासदार, माजी आमदार, माजी खासदार, सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नेतृत्वाला हेव्यादाव्यांची भिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवसंकल्प शिबीर परिसरात माध्यमांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला होता. परंतू शिबीर ज्या सभागृहात सुरू होते तेथे प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला होता. मंत्रीपद न मिळाल्याने अजित पवार गटातील अनेक ज्येष्ठ नेते नाराज आहेत. शिबिराच्या व्यासपीठावरून केलेल्या पक्षांतर्गत हेव्यादाव्यांचे पडसाद बाहेर जावू नये म्हणून माध्यमांना शिबिरापासून दूर ठेवण्यात आल्याची चर्चा होती.