Saturday, May 30, 2026
Homeमुख्य बातम्याविलिनीकरणाच्या चर्चांवर ब्रेक? शरद पवारांचा मोठा निर्णय; तिघांच्या खांद्यावर जबाबदारी देत इतरांना...

विलिनीकरणाच्या चर्चांवर ब्रेक? शरद पवारांचा मोठा निर्णय; तिघांच्या खांद्यावर जबाबदारी देत इतरांना ‘नो टॉकिंग’च्या कडक सूचना

मुंबई । Mumbai

- Advertisement -

राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या हालचालींना आता वेगळे वळण मिळताना दिसत आहे. १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण करण्याबाबत एकमत झाल्याची चर्चा असतानाच, आता या प्रक्रियेला ‘ब्रेक’ लागल्याची चिन्हे आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आपल्या नेत्यांना या विषयावर जाहीर भाष्य करण्यास मज्जाव केला आहे.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असा दावा केला होता की, येत्या १२ फेब्रुवारीला पक्षाच्या विलिनीकरणाची अधिकृत घोषणा होणार होती. खुद्द अजित पवार यांचीच दोन्ही पक्ष एकत्र येण्याची तीव्र इच्छा होती, असे विधान प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि जयंत पाटील यांनी केले होते. मात्र, अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. “आम्हाला अशा कोणत्याही विलिनीकरणाची माहिती नाही,” असे भुजबळांनी स्पष्ट केल्याने दोन्ही गटांतील विसंगती चव्हाट्यावर आली आहे.

विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून पक्षात आणि माध्यमांमध्ये गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी शरद पवार गटाने कठोर पावले उचलली आहेत. पक्षाचे प्रवक्ते किंवा इतर कोणत्याही नेत्याने या संवेदनशील विषयावर वरिष्ठांच्या परवानगीशिवाय माध्यमांशी बोलू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. चुकीच्या माहितीमुळे चर्चा भरकटू नये आणि संभ्रम निर्माण होऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाने विलिनीकरणाबाबतची अधिकृत भूमिका मांडण्याची जबाबदारी केवळ तीन ज्येष्ठ नेत्यांवर सोपवली आहे. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विद्यमान प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे. या तिघांव्यतिरिक्त इतर कोणीही विलिनीकरणावर भाष्य करू नये, असे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या १० दिवस आधी शरद पवार आणि अजित पवार यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली होती. ही बैठक विलिनीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठीच होती, असा दावा आता शरद पवार गटाकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, ही गुप्त बैठक आमदार जयंत पाटील यांच्या निवासस्थानी पार पडल्याची माहिती आता समोर येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आहे. मात्र, अजितदादांच्या मृत्यूपूर्वी सुरू झालेली विलिनीकरणाची ही प्रक्रिया आता पूर्णत्वास जाणार की कायमची थांबणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

IPL 2026 – RR VS GT : गिलच्या शतकाचा धमाका! गुजरात...

0
आयपीएल २०२६च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात आज गुजरात ने राजस्थान वर दमदार विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली. न्यू चंदीगडच्या मुल्लांपूर मैदानावर झालेल्या या हायव्होल्टेज...