Wednesday, May 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNCP New Strategist: मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या ‘पिंक पॉलिटिक्स’चा रणनितीकार बदलला; सुनेत्रा पवारांनी...

NCP New Strategist: मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या ‘पिंक पॉलिटिक्स’चा रणनितीकार बदलला; सुनेत्रा पवारांनी निवडला नवा ‘चाणाक्य’

मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डिझाईन बॉक्सनंतर लवकरच नव्या राजकीय रणनीती ठरवणाऱ्या संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सारे काही आलबेल नसल्याचा दावा करण्यात येत आहे. पक्षातील काही जेष्ठ नेते नाराज असल्याच्या चर्चा आहे. त्यातच पक्षाची रणनिती ठरवण्यासाठी पक्षाकडून ‘डिझाईन बॉक्स’नंतर आता I-PAC या संस्थेची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार , खासदार पार्थ पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची बैठक पार पडली. या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला. प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणनीतीकार म्हणून काम पाहणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच बैठकीनंतर आवश्यक सोपस्कार पूर्ण करण्यात आले असून, पुढील दोन दिवसांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर I-PAC अधिकृतपणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी काम सुरू करणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

१ जूनपासून प्रशांत किशोर पाहणार काम
बैठकीचे सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर येत्या 2 दिवसांत कायदेशीर बाबी पूर्ण करून लवकरच प्रशांत किशोर यांची कंपनी कामाला सुरुवात करणार आहेत. १ जूनपासून प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणनीतीकार म्हणून काम पाहणार असल्याची माहिती मिळत आहे. पक्षाची प्रतिमा मजबूत करणे, सोशल मीडिया मोहिमा, मतदारांशी संवाद वाढवणे आणि बूथस्तरावर संघटन मजबूत करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ; तुमच्या जिल्ह्यात काय किती रुपयांनी महागलं इंधन?

डिझाईन बॉक्सने या आधी राष्ट्रवादीचे काम केले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणुकीसाठी या आधी डिझाईन बॉक्स ही कंपनी काम करत होती. पण अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर डिझाईन बॉक्सने काम थांबवले. नरेश अरोरा पॉलिटिकल कॅम्पेन मॅनेजमेंट कंपनी design boxed.com चे सहसंस्थापक आहेत. त्यांनी राजस्थान, कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये काँग्रेससाठी निवडणूक प्रचाराचं काम पाहिलं आहे. राजकीय ब्रँडिंग, संदेश व्यवस्थापन आणि इमेज मेकओव्हर यात त्यांचा हातखंडा आहे. लोकसभा निवडणुकीतील धक्क्यानंतर अजित पवार यांच्या पक्षाला नव्याने उभे करण्याची जबाबदारी त्यांनी आणि त्यांच्या टीमने घेतली होती. लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर अजित पवार हे गुलाबी जॅकेटमध्ये दिसले होते. अजित पवार यांच्यासाठी ‘गुलाबी कॅम्पेनिंग’ नरेश अरोरा यांनीच राबवले होते.

कोण आहे प्रशांत किशोर?
प्रशांत किशोर हे एक प्रसिद्ध भारतीय राजकीय रणनीतिकार आणि ‘जन सुराज पक्षा’चे संस्थापक आहेत. त्यांना राजकीय वर्तुळात ‘पीके’ म्हणूनही ओळखले जाते. राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांच्या बळावर आम आदमी पक्षानेच नाही तर भाजपसह इतर पक्षांनी मोठी झेप घेतल्याचा दावा करण्यात येतो. बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या गळ्यातील तर ते ताईत होते. पण दोघांमध्ये बिनसल्यानंतर प्रशांत किशोर यांनी थेट त्यांचा जनसुराज्य पक्ष स्थापन करुन बिहारमधील विधानसभा निवडणुकीत उतरवला. मात्र त्यांना निवडणुकीत अपयश आले.

आता प्रशांत किशोर हे अजित दादांच्या राष्ट्रवादीचे रणनितीकार म्हणून काम सांभाळणार असल्याची माहिती समोर येत आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय सल्लागार म्हणून ते काम पाहणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

I-PAC ची देशात ओळख
I-PAC ही देशातील प्रसिद्ध राजकीय सल्लागार संस्था मानली जाते. विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये डेटा विश्लेषण, प्रचार मोहीम, मतदार संपर्क आणि डिजिटल रणनीती यामध्ये या कंपनीने काम केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेससोबतची ही संभाव्य भागीदारी महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण करू शकते.

ताज्या बातम्या

default-featured-image

Nashik APMC News : नाशिक बाजार समिती उपसभापतीपदी प्रल्हाद काकड

0
पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Nashik APMC News) उपसभापतीपदी प्रल्हाद काकड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. माजी उपसभापती जगन्नाथ...