मुंबई | Mumbai
बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर मध्यरात्रीच्या सुमारास वांद्रे (Bandra) येथील राहत्या घरी जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत सैफ अली खानला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच त्याच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर मनोरंजन क्षेत्राबरोबरच राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच आता या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत शंका व्यक्त केली आहे.
आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी त्यांच्या एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो.गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे.
कारण सैफ अली खान यांच्यावर एकूण सहा वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीमधून समोर येत आहे. त्यातील दोन वार हे गंभीर स्वरुपाचे असल्याचे समजते. एक वार त्यांच्या मानेवर करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांच्या मनक्यावर गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोराची वार करण्याची पद्धत बघता, वार हा जिवे मारण्याच्या हेतूनेच करण्यात आल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. सैफ अली खान हे भारतामधील चौथ्या क्रमांकाचा सन्मान समजल्या जाणार्या पद्श्री पुरस्काराने सन्मानित आहे. हे विशेष!”, असे त्यांनी म्हटले आहे.
कसा झाला सैफवर हल्ला?
हल्लेखोर हा अभिनेता सैफ अली खानच्या घरात रात्री दोन वाजताच्या सुमारास घुसला. सुरुवातीला तो लहान मुलांच्या खोलीत गेला. तिथे घरकाम करणाऱ्या महिलेसोबत त्याची बाचाबाची झाली. आवाज ऐकून सैफ तिथे गेला आणि त्याने हटकताच दोघांमध्येही जोरदार वादावादी झाली. त्यानंतर झटापटीत चोराने सैफ आणि मोलकरणीवर चाकूने वार केले. सहा वेळा वार झाल्यामुळे हल्ल्यात सैफ अली गंभीर जखमी झाला. तर मोलकरणीलाही दुखापत झाली आहे. मात्र या हल्ल्याचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.