मुंबई | Mumabi
नाशिकसह संपूर्ण राज्यात भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एसआयटीकडून तपास करण्यात येत असून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. अशामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना या प्रकरणात दुसरा मोठा दणका बसला आहे. शुक्रवारी (27 मार्च) रात्री उशिरा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सोशल मीडियावरून जाहीर केले.
रुपाली चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली. अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला प्रदेशाध्यक्षपद गमवावे लागले आहे. यानंतर चाकणकर यांचे विरोधक त्यांच्यावर तुटून पडले आहेत. शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर त्यांच्यावर बोचऱ्या भाषेत टीका केली.
आज रंगणार ‘बागलाण भूषण’ पुरस्कार सोहळा
काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी कुठेही नाव न घेता अप्रत्यक्षपणे रुपाली चाकणकर यांच्या जिव्हारी लागेल अशी टीका केली आहे. ‘वैयक्तिक’कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ २ ओळींच्या राजीनाम्यावर उतरला…’ एवढीच त्यांनी एक्सवर पोस्ट केली आहे.
रुपाली ठोंबरे पाटलांची टीका
अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही चाकणकर यांना लक्ष्य केले होते. चाकणकरने राजीनामा दिला नाही घेतला गेला आहे. भोंदूबाबा खरात बलात्कार प्रकरणात त्या आरोपी असल्याने सगळी चौकशी होणार. SIT ला मर्यादा होत्या आता त्या संपल्या. धन्यवाद मा. सुनेत्रा वहिनी. ज्या सर्व लोकांनी हया पदाचा दुरुपयोग केला ते सर्व आरोपी आहेत. आज मा. अजितदादांच्या कार्यकर्त्या बहिणी समाधानी झाल्या आहेत, असे रुपाली ठोंबरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
माध्यमातून होत असलेले आरोप वेदनादायक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, “भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाबाबत पहिल्या दिवशीच मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. त्याच्याआर्थिक व्यवहारात, त्याच्या गैरकृत्यात दुरान्वये संबंध नाही. आजही तीच स्पष्ट आणि ठाम भूमिका आहे. तपासादरम्यान या सर्व बाबी निष्पन्न होतीलच. खोटे,असत्य आणि कुठलाही पुरावा नसताना जे आरोप माध्यमांमधून होत आहेत, ते वेदनादायक आहे. सत्य प्रखरतेने सिद्ध होईलच.” हा तपास पारदर्शकपणे व निष्पक्षपणे व्हावा,ही माझी मागणी मी यापूर्वीच मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री,मा.पोलिस महासंचालक यांच्याकडे केली आहे. आज सकाळी फोनद्वारे आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार मी माझ्या राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.





