Wednesday, August 12, 2026
HomeराजकीयNDA MPs March Against Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात NDA खासदारांचे संसदेत...

NDA MPs March Against Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधात NDA खासदारांचे संसदेत आंदोलन

दिल्ली । Delhi

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राजकीय पारा भलताच चढला असून, सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. एकीकडे NEET पेपरफुटी, आंदोलक विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवरून विरोधी पक्ष आक्रमक होऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उत्तराची मागणी करत आहे; तर दुसरीकडे भाजप आणि ‘एनडीए’च्या (NDA) खासदारांनी थेट विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधातच मोर्चा उघडला आहे. राहुल गांधी हे चर्चेपासून दूर पळत असल्याचा गंभीर आरोप करत एनडीए खासदारांनी संसद परिसरात जोरदार निदर्शने केली.

- Advertisement -

रांचीमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेवरून सत्ताधारी पक्ष कमालीचा आक्रमक झाला आहे. राहुल गांधी यांनी यावर उत्तर द्यावे, अशी मागणी करत भाजप नेत्यांनी संसदेत आणि सोशल मीडियावर राहुल गांधींविरोधात जोरदार घेराबंदी सुरू केली आहे. एक्स (ट्विटर) व अन्य सोशल प्लॅटफॉर्मवर भाजपकडून ‘#RahulBhagnaNahi’ ही हॅशटॅग मोहीम राबवली जात असून, या मोहिमेची सध्या राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नड्डा म्हणाले, “राहुल गांधी जंतर-मंतरच्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करत आहेत. काँग्रेस पक्ष नेहमी संसदेत चर्चेची मागणी करतो, परंतु जेव्हा सरकार सविस्तर उत्तर देण्यासाठी पुढे येते, तेव्हा विरोधी पक्ष सभागृहातून काढता पाय घेतो.”

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे NEET आणि विद्यार्थ्यांशी संबंधित प्रत्येक प्रश्नाचे उत्तर संसदेत देण्यास पूर्णपणे तयार आहेत, असा पुनरुच्चारही नड्डा यांनी केला. “सरकारने यापूर्वीही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर संसदेत उत्तरे दिली असून, त्याचा रेकॉर्ड संसदीय कामकाजात नोंदवला गेला आहे. त्यामुळे राहुल गांधी यांनी चर्चेपासून पळून न जाता सभागृहात यावे आणि सरकारचे उत्तर ऐकावे,” असे खुले आव्हानच नड्डा यांनी दिले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या वादात उडी घेत सोशल मीडियावर राहुल गांधी आणि विरोधी पक्षावर निशाणा साधला. “लोकशाही प्रश्न विचारण्याचे स्वातंत्र्य देते, पण त्याच वेळी उत्तरे ऐकण्याची जबाबदारीही टाकते. गृहमंत्री अमित शाह विद्यार्थ्यांशी संबंधित सर्व मुद्द्यांवर सभागृहात वस्तुस्थिती मांडण्यास तयार आहेत. काँग्रेस आणि विरोधकांनी सभागृहाची प्रतिष्ठा जपावी. लोकशाहीत चर्चेतून मान-सन्मान वाढतो, पळून जाण्याने नाही,” अशा शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांना टोला लगावला.

एकंदरीत, विद्यार्थी आंदोलन आणि NEET पेपरफुटीवरून सुरू झालेला हा राजकीय संग्राम आता ‘राहुल गांधी विरुद्ध एनडीए’ असा वैयक्तिक आणि राजकीय संघर्षाच्या वळणावर येऊन पोहोचला आहे. संसदेच्या उर्वरित दिवसांत हा वाद काय वळण घेतो, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : त्र्यंबकेश्वरला श्रावण यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांनी पोलिसांच्या सूचनांचे पालन...

0
नाशिक | Nashik त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे श्रावण महिन्यात १३ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत भरणाऱ्या यात्रेनिमित्‍त येणाऱ्या भाविकांनी सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांच्या सूचनांचे...