नाशिक | प्रतिनिधी
हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री. प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व शिवभक्त महादेवाची मोठया भक्ती भावाने पूजा करतात आणि उपवास करतात. अशातच रविवार (दि. १५) फेब्रुवारी रोजी १२ ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस विभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात महाशिवरात्री व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कुंभमेळा साहित्य मागणी प्रस्तावबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी कुंदन हिरे, पोलीस निरिक्षक सोहन माचरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोडके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे त्र्यंबक नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी विजय जाधव, नगर अभियंता स्वप्नील काकड, यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
दिंडोरी जीवन गौरव व दिंडोरी दर्पण पुरस्कारांची घोषणा
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने शहरात स्वच्छता ठेवावी. तसेच सर्व स्थानिक सर्व अधिकाऱ्यांनी मुख्यालयाच्या ठिकाणी थांबावे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने यंत्रणा सज्ज ठेवावी. रथ मिरवणूक मार्गात गर्दीचे योग्यप्रकारे नियोजन करण्याबाबत त्यांनी सूचित केले.
तसेच, नाशिक महानगपालिका, नाशिक स्मार्ट सिटि, पोलीस विभाग (नाशिक शहर व ग्रामीण), आरोग्य विभाग (नाशिक), जिल्हा परिषद (नाशिक), त्र्यंबकेश्वर नगरपरिषद व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकारणामार्फत आपत्ती व्यवस्थापन सहसाहित्यासाठी एकूण रूपये 373.92 कोटी रुपयांच्या निधी मागणी प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तांत्रिक मान्यतेच्या अधीन राहून सदर प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी तातडीने पाठविण्यात यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले.





