पुणे | Pune
नीट पेपरफुटी प्रकरणी (Neet Paper Leak Case) दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणाचे धागेदोरे नाशिक, लातूरसह राजस्थानपर्यंत पोहोचले आहेत. त्यानंतर आता या प्रकरणात सीबीआयने लातूर (Latur) येथील नामांकित आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर (Shivraj Motegaonkar) यांना ताब्यात घेतले आहे. काल (रविवारी) लातूर येथील नीट क्लास संचालक शिवराज मोटेगावकर यांची ११ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज (सोमवारी) त्यांना सीबीआयने ताब्यात घेतले.

सीबीआयच्या (CBI) पथकाने केलेल्या चौकशीत काय निष्पन्न झाले हे समोर आले नाही. मात्र, क्लास संचालकाची ११ तास चौकशी करून हे पथक दिल्लीला रवाना झाले होते. यावेळी मोटेगावकर यांच्या कार्यालयातून लॅपटॉप आणि आयपॅड यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली. सीबीआयला तक्रार मिळाल्यानंतर या कोचिंग सेंटरवरील संशय अधिकच बळावला. आरसीसी इन्स्टिट्यूटच्या सराव परीक्षेतील अनेक प्रश्न प्रत्यक्ष नीट २०२६ च्या प्रश्नपत्रिकेशी मिळतेजुळते होते, असा दावा करण्यात आला होता. तसेच सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये संस्थेचे प्रमुख विद्यार्थ्यांना विचारत आहेत की सराव परीक्षेतील किती प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आले होते, यावर विद्यार्थी होकारार्थी उत्तर देत असल्याचे दिसत आहे.
दरम्यान, पेपरफुटी प्रकरणाचा सूत्रधार प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी हा देखील लातूरचाच असल्याचे तपासात उघड झाल्यावर हे प्रकरण गंभीर बनले. तो एनटीएशी (NTA) संबंधित होता आणि त्याला आधीच अटक करण्यात आली आहे. कुलकर्णी आणि मोटेगावकर एकमेकांना ओळखत होते. काही वर्षांपूर्वी त्यांच्यात मतभेद झाले होते, पण नंतर त्यांच्यात सलोखा झाला. या संबंधाचा तपास करण्यासाठी सीबीआयने रविवारी पुन्हा लातूरमधील मोटेगावकर यांच्या कार्यालयाला भेट दिली होती.
कोण आहेत शिवराज मोटेगावकर?
शिवराज मोटेगावकर हे मूळचे लातूरचे असून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी केमिस्ट्री (रसायनशास्त्र) विषयातून एमएससी पूर्ण केले असून, ते या विषयात सुवर्णपदक विजेते (Gold Medalist) आहेत. त्यांनी केवळ अध्यापनच केले नाही, तर SET/NET-JRF, GATE, DRDO, BARC आणि TIFR यांसारख्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. उच्च शिक्षणांनंतर मोठ्या पगाराच्या नोकरीमागे न धावता त्यांनी लातूरमध्ये राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा निर्णय घेतला.
कोचिंग क्लासेसची सुरुवात कधी झाली?
आरसीसी या संस्थेची सुरुवात १९९९ मध्ये फक्त १० विद्यार्थ्यांसह झाली आणि आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तिच्या शाखा आहेत. दरवर्षी, नीट (NEET) आणि जेईई (JEE) परीक्षांची तयारी करण्यासाठी अंदाजे ४०,००० विद्यार्थी येथे प्रवेश घेतात. प्रति विद्यार्थी सरासरी ५०,००० ते ६५,००० रुपये शुल्क आकारून, या कोचिंग संस्थेची वार्षिक उलाढाल १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे.




