दिल्ली । Delhi
देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाची धग आता अधिक तीव्र झाली असून, राजकीय वर्तुळात त्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील महिन्याभराचे आंदोलन आणि बिहारमधील घटनांवरून आता विरोधकांनी थेट केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत सरकारवर जोरदार टीका केली आहे.
काही दिवसांपूर्वी दिल्लीत नीट पेपरफुटीप्रकरणी विद्यार्थ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत तीव्र आंदोलन केले होते. एक महिन्याहून अधिक काळ चाललेल्या या आंदोलनानंतर अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, आंदोलनादरम्यान संसदेवर काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता, ज्यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले होते.
या घटनेपाठोपाठ बिहारमध्येही आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. बिहारमधील आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांना धमकावण्यासाठी ‘एके-४७’ (AK-47) रायफल दाखवण्यात आल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले होते. दिल्लीतील लाठीचार्ज आणि बिहारमधील या धक्कादायक प्रकारामागे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेच आदेश असल्याचा गंभीर आरोप विरोधकांकडून केला जात आहे.
या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला आणि गृहमंत्रालयाला कडक शब्दांत सुनावले. “तुम्ही सभागृहासमोर यायला घाबरत आहात, मग नक्की पळपुटं कोण आहे?” असा थेट सवाल चव्हाण यांनी उपस्थित केला. “सरकारने आधी या घटनांवर संसदेत येऊन स्पष्टीकरण दिले पाहिजे. जर तुमच्या उत्तराने आमचे समाधान झाले, तर आम्ही काहीही बोलणार नाही. पण सरकार उत्तर देण्यापासून पळ काढत आहे,” असे ते म्हणाले.
आंदोलकांवरील कारवाईवर प्रश्न उपस्थित करताना चव्हाण म्हणाले, “आंदोलनांवर गोळीबार झाला की नाही? पॅलेट गनचा वापर झाला की नाही? या कारवाईत एका तरुणाने आपला डोळा गमावला आहे. बिहारमध्ये थेट एके-४७ वापरण्यात आली. हे सगळे करण्याचे आदेश नक्कीच कोणीतरी दिले असतील. जर गृहमंत्र्यांनी हे आदेश दिले नसतील, तर त्यांनी तसे स्पष्ट सांगावे. घडणाऱ्या घटनांची माहिती नसणारे गृहमंत्री पद सांभाळण्यास अकार्यक्षम ठरतात, त्यामुळे अमित शाह यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे.”
“सभागृहात न येणे हा लोकशाहीचा, घटनेचा आणि देशाच्या जनतेचा अपमान आहे. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी विरोधकांच्या डोक्यावर खापर फोडणे सरकारने थांबवावे,” असा इशाराही चव्हाण यांनी दिला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागल्याने येत्या काळात हे प्रकरण राजकीयदृष्ट्या अधिक तापण्याची शक्यता आहे.




