Wednesday, May 20, 2026
Homeदेश विदेशNepal Politics : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा...

Nepal Politics : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा तडकाफडकी राजीनामा

काठमांडू । Kathmandu

नेपाळच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झाला आहे. पंतप्रधान बालेन शाह यांच्या सरकारमधील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर होत असलेले भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप आणि वाढता जनक्षोभ यामुळे नेपाळचे राजकारण ढवळून निघाले असून, या राजीनाम्याने सत्तेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

गृहमंत्री सुदान गुरुंग यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता जमा केल्यापासून ते मनी लाँड्रिंगपर्यंत अनेक धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. विशेषतः एका वादग्रस्त उद्योगपतीशी संबंधित कंपन्यांमध्ये त्यांनी शेअर्स खरेदी केल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या प्रकरणावरून संसदेपासून रस्त्यांपर्यंत त्यांच्याविरोधात निदर्शने सुरू होती. अखेर वाढता दबाव लक्षात घेता, गुरुंग यांनी पंतप्रधान बालेन शाह यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला याची माहिती दिली.

आपल्या राजीनाम्यात गुरुंग यांनी अत्यंत भावूक आणि वैचारिक भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले की, “माझ्यासाठी सत्तेच्या खुर्चीपेक्षा नैतिकता आणि जनतेचा विश्वास अधिक महत्त्वाचा आहे. आज नेपाळमध्ये सुशासन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी करणारी ‘जेन झी’ (Gen Z) चळवळ उभी राहिली आहे. या तरुणांचा संदेश स्पष्ट आहे की, सार्वजनिक जीवन स्वच्छ असले पाहिजे. मी या चळवळीचा आणि जनतेच्या चिंतांचा सन्मान करत पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.”

राजीनामा देण्यामागील कायदेशीर बाजू स्पष्ट करताना गुरुंग म्हणाले की, “माझ्या ४६ शहीद बंधू-भगिनींच्या बलिदानाने हे सरकार स्थापन झाले आहे. अशा पवित्र सरकारवर जर कुणी बोट उचत असेल, तर त्याचे उत्तर नैतिक असायला हवे. माझ्यावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी माझी इच्छा आहे. मी पदावर असताना तपासावर कोणताही परिणाम होऊ नये आणि हितसंबंधांचा संघर्ष (Conflict of Interest) निर्माण होऊ नये, यासाठी मी गृहमंत्री पद सोडत आहे.”

गुरुंग यांनी नेपाळच्या तरुणांना आणि पत्रकार मित्रांना उद्देशून एक आवाहनही केले आहे. ते म्हणाले, “ज्यांना समाजात बदल हवा आहे, त्यांनी सत्य आणि आत्मशुद्धीच्या मार्गावर चालले पाहिजे. ज्यांना रामराज्याची आकांक्षा आहे, त्यांच्यात त्याग करण्याचे धैर्यही असायला हवे.” या राजीनाम्यामुळे आता बालेन शाह सरकार या संकटातून कसे सावरते आणि नवीन गृहमंत्री म्हणून कोणाची वर्णी लागते, याकडे संपूर्ण दक्षिण आशियाचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Onion : कांदा दर घसरणीची केंद्राकडून गंभीर दखल; उच्चस्तरीय केंद्रीय पथक...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik विक्रमी उत्पादनानंतर कांद्याचे दर अक्षरशः कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना अखेर केंद्र सरकारने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. ग्राहक...