उत्तर प्रदेश : उन्नाव येथील अत्याचार पीडित महिलेला गुरुवारी पहाटे आरोपींकडून जाळण्याचा प्रयत्न केला होता. यात पीडिता ९० टक्क्यांपेक्षा जास्त भाजली होती. त्यानंतर तिला दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होते. परंतु शुक्रवारी रात्री ११. ४० च्या सुमारास पीडितेने अखेरचा श्वास घेतला. उपचार सुरू असताना पीडितेला हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
गुरुवारी पीडित तरुणी अत्याचार प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात जात होती. त्यावेळी आरोपींनी तिला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. पीडितेवर मागच्या वर्षी अत्याचार करणाऱ्या २ आरोपींपैकी एकाला १० दिवसांपूर्वी जामीन मिळाला होता. तसेच या प्रकरणातील दुसरा आरोपी मात्र फरार आहे.
पोलिसांनी गुरुवारी याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. या तिघांपैकी दोघांवर पीडितेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी एकाला अटक केली होती. परंतु, त्याची जामीनावर सुटका झाली होती. शुक्रवारी दुपारी सफदरजंग रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर असून वाचण्याचा शक्यता कमी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर शुक्रवारी रात्री पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.