Thursday, May 2, 2024
Homeनगर‘हे’ नियम मोडाल तर पाचशेचे 5000!

‘हे’ नियम मोडाल तर पाचशेचे 5000!

अहमदनगर (प्रतिनिधी) / Ahmednagar – यापुढे वाहतूक नियमांची अंमलबजावणी न करणे वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. नगर वाहतूक पोलिसांनी शासन निर्णयानुसार सुधारित दंड आकारणी लागू केली असून विनालायसन वाहन चालविणार्‍यांना आता 500 रूपयांऐवजी थेट 5 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. नव्या दंड आकारणीनुसार आता नियमभंगासाठी किमान दंडाची रक्कम 200 ऐवजी थेट 500 रूपयांवर पोहचली आहे.

अहमदनगर पोलीस दलाच्या वाहतूक शाखेने शासनाच्या मोटार वाहन (सुधारित) अधिनियम 2019नुसार दंड आकारणीस शनिवारी भल्या पहाटेपासून सुरूवात केली आहे. ई-चलन पद्धतीने ही दंड आकारणी होणार आहे. लायसनशिवाय वाहन चालविणे आता अतिमहागात पडणार आहे. यासाठी आधी 500 रूपये दंड आकारला जात होता. आता थेट 5 हजार रूपये दंड होणार आहे. या प्रकारणात न्यायालयात खटला दाखल करण्याचीही तरतूद आहे. लायसनशिवाय वाहन चालविताना दुसर्‍यांदा किंवा पुन्हा, पुन्हा सापडल्यास दंडासोबत 3 महिन्यांसाठी लायसन अवैध ठरविले जाणार आहे. नव्या नियमानुसार दंडाची सर्वाधिक वाढ लायसनशिवाय वाहन चालवून नियम मोडणार्‍यांसाठी झाली आहे.

- Advertisement -

शिकाऊ वाहनचालकाने एल बोर्डशिवाय वाहन चालविले तर 200 ऐवजी 500 आणि पुन्हा नियम मोडल्यास 1500 रूपये दंड होणार आहे. विना हेल्मेट वाहनचालकांसाठी 500 रूपयांचा दंड आणि दुसर्‍यांदा हा नियम मोडल्यास 3 महिन्यासाठी लायसन अवैध ठरणार आहे. गाडी चालविताना मोबाईल चालविणार्‍यांना 200 रूपये दंड आकारला जात होता, तो आता 500 रूपये करण्यात आला आहे. पुन्हा नियम मोडणार्‍यांना 1500 रूपयांचा दंड होणार आहे.

कार चालविताना सिट बेल्ट न वापरणार्‍यांना आता 200 ऐवजी 500 रुपये दंड भरावा लागेल. नियमाचे पुन्हा उल्लंघन केल्यास 1500 रूपये दंड आकारणी होईल. ट्रिपल सिटसाठी दंड आकारणी थेट पाचपट झाली आही. त्यामुळे आता 200 रूपयांऐवजी 1 हजार रुपये दंड होईल. पुन्हा ट्रिपल सिट सापडल्यास 3 महिने लायसन अवैध ठरविले जाणार आहे.

राँगसाईड वाहन चालविणार्‍यांची आता दंड भरून सुटका होणार नाही. आधी 1 हजार रूपये दंड भरावा लागत होता. आता थेट न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे. कर्णकर्कश हॉर्न वाजविणार्‍यांनी आता सावध झालेले बरे. अन्यथा थेट 1 हजारांचा दंड भरावा लागाणार आहे. आधी हा दंड 200 रूपये होता. हॉर्न वाजवून पुन्हा डोकेदुखी वाढविली तर थेट 2 हजारांचा दंड होणार आहे.

रस्त्यावर पोलीसांच्या इशार्‍याकडेही आता वाहन चालकांना डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागेल. पोलीस इशार्‍याचे पालन केले नाही तर 200 ऐवजी आता 500 रूपयांचा दंड भरावा लागणार आहे. पुन्हा तिच चूक केली तर 1500 रूपये दंड होईल. कारच्या काचांना ब्लॅक फिल्म लावल्यास 200 ऐवजी 500 रूपये दंड भरावा लागेल. पहिल्या दंडानंतरही काळी फिल्म कायम ठेवल्यास पुन्हा 1500 रूपये दंड भरण्याची तयारी कारमालकांना ठेवावी लागेल. मादक द्रव्याचे सेवन करून वाहन चालविणार्‍यांना थेट न्यायालयात खटला चालविला जाणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या