पंचवटी | प्रतिनिधी Panchavati
श्री कपालेश्वर महादेव मंदिर परिसरातील बीवलकर वाडा प्रकरणाने पुन्हा एकदा नवे वळण घेतले असून,अतिक्रमण हटाव मोहिमेवरून मनपा प्रशासन, मंदिर संस्थान आणि मुख्य पुजारी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. शुक्रवारी (दि.५) महानगरपालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक मोठ्या पोलीस बंदोबस्तासह कारवाईसाठी दाखल झाले होते. मात्र कोणतीही ठोस कारवाई न करता पथकाला माघारी फिरावे लागले.
या पार्श्वभूमीवर मुख्य गुरव पुजारी हेमंत (पप्पू) गाडे यांनी रविवारी (दि.७) पत्रकार परिषद घेत मंदिर ट्रस्ट आणि प्रशासनावर गंभीर आरोप केले. “माझे पूर्वज सनदेनुसार मंदिराची वंशपरंपरागत सेवा करत आले आहेत. आम्ही राहत असलेला शंभर वर्षांहून जुना वाडा शासकीय मूल्यांकनानुसार ४० लाख रुपयांचा असताना, ट्रस्टींनी तो मूळ मालकाकडून तब्बल ८० लाख रुपयांत खरेदी केला. हा व्यवहार संशयास्पद असून आम्हाला बेघर करण्यासाठी कट रचला जात आहे,” असा आरोप गाडे यांनी केला.तसेच, “वाडा धोकादायक घोषित करून मनपा अधिकाऱ्यांशी संगनमताने कारवाईचा घाट घालण्यात आला. आम्हाला कोणतीही योग्य कायदेशीर प्रक्रिया न पाळता नोटिसा देण्यात आल्या. या अन्यायाविरोधात आम्ही मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने आमचे अपील मंजूर केले आहे,” असेही त्यांनी सांगितले.
गाडे यांनी मंदिर प्रशासनातील कथित गैरव्यवहारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “२००४ पासून प्रशासकीय पातळीवर नियमबाह्य कारभार सुरू असून, मंदिर डागडुजी आणि सँड ब्लास्टिंगच्या नावाखाली खर्च झालेल्या लाखो रुपयांचा हिशोब अद्याप स्पष्ट झालेला नाही. आमच्यावर दबाव आणण्यासाठी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले असून मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची छेडछाड करून भाविकांची दिशाभूल केली जात आहे,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला.दरम्यान, मंदिर संस्थानकडून धोकादायक भाग हटवून त्या ठिकाणी भक्त निवास उभारण्याची भूमिका कायम ठेवण्यात आली आहे. मात्र मुख्य पुजाऱ्यांनी उपस्थित केलेले आर्थिक गैरव्यवहार, न्यायालयीन लढाई आणि कथित संगनमताचे आरोप यामुळे हे प्रकरण आता अधिकच चिघळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.




