Tuesday, November 24, 2026
HomeनगरNewasa : खिडकीचे गज तोडून नेवाशात जबरी चोरी

Newasa : खिडकीचे गज तोडून नेवाशात जबरी चोरी

17 तोळे सोन्याचे दागिने, 3 ग्रॅम हिर्‍याची अंगठी, 100 ग्रॅम चांदी व 5 लाख रुपये लंपास

नेवासा |शहर प्रतिनिधी/तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा शहरातील मध्यवस्तीत मिठाई व्यापार्‍याच्या घराच्या खिडकीचे गज कापून जबरी चोरी केल्याची घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. 17 तोळे सोन्याचे दागिने, 3 ग्रॅम हिर्‍याची अंगठी, 100 ग्रॅम वजनाचे चांदीचे शिक्के तसेच 5 लाख रुपयांची रक्कम चोरीस गेली.

- Advertisement -

याबाबत रामभाऊ गणपत जगताप (वय 72) धंदा-शेती व मिठाई दुकान रा. देशपांडेनगर नेवासा खुर्द यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी, पत्नी, दोन मुले व सुना असे एकत्रित कुटूंबात राहतो. गुरुवारी रात्री 11.30 आम्ही सर्व घरात झोपी गेलो. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास मी लघुशंकेसाठी बाथरुमधे जात असताना बेडरुमचा दरवाजा उघडा दिसला. त्यावेळी पाहणी केली असता बेडरुममधील साहित्यांची उचकापाचक झाल्याचे दिसून आले. तेव्हा मी घरच्यांना उठवून घराची पाहणी केली असता घराच्या खिडकीचे लोखंडी गज तोडल्याचे दिसून आले. तेव्हा माझी खात्री झाली की, अज्ञात चोरट्याने घराच्या खिडकीचे गज तोडून घरात प्रवेश करुन चोरी केली.

त्यामुळे मी पोलिसांना फोन करुन बोलावून घेतले. पोलिसांनी कोणत्याही वस्तूंना हात लावू नका असे सांगून श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना बोलावून घेतले. सर्व तपासणी झाल्यानंतर मी बेडरुममधील कपाटाची पाहणी केली असता कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीस गेल्याचे दिसून आले. चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये 2 तोळे वजनाचे सोन्याचे ब्रेसलेट, 2 तोळे सोन्याचे चेन, 3 तोळे वजनाच्या सोन्याच्या 7 अंगठ्या, 7 तोळे वजनाचे मणिमंगळसूत्र, 1 तोळे वजनाची सोन्याची पोत, 2 तोळे वजनाच्या लहान मुलांच्या सोन्याच्या अंगठ्या असे एकूण 17 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच 100 ग्रॅम वजनाची चांदी (20 शिक्के), 3 ग्रॅम हिर्‍याची अंगठी तसचे 5 लाख रुपये रोख रक्कम असा ऐवज चोरीस गेला. या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ऊसदरावर निर्णय न झाल्यास शनिवारी रेलरोको-रास्तारोको

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या ऊसाला राज्यातील अन्य जिल्ह्याप्रमाणे भाव मिळावा, या मागणीसाठी 26 तारखेला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीत...