Tuesday, December 3, 2024
Homeनगरआरोप-प्रत्यारोपांनी ऐन थंडीत नेवाशात राजकीय वातावरण तापले

आरोप-प्रत्यारोपांनी ऐन थंडीत नेवाशात राजकीय वातावरण तापले

लंघेंसाठी मुख्यमंत्र्यांची सभा, मुरकुटेंसाठी बच्चू कडू यांचा मेळावा तर गडाखांनी दिला थेट मतदारांशी संपर्कावर भर

अशोक पटारे | नेवासा | Newasa

221 नेवासा विधानसभा मतदारसंघासाठी 20 नोव्हेंबरला होत असलेल्या निवडणुकीसाठी प्रचारात रंगत आली आहे. एक आजी व एक माजी आमदार तसेच एक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशी लढत रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तिन्ही उमेदवारांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

- Advertisement -

2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत बाळासाहेब मुरकुटे जवळपास पाच हजार मतांच्या फरकाने विजयी झाले होते तर गेल्यावेळी अपक्ष रिंगणात उतरलेल्या शंकरराव गडाख यांनी मुरकुटेंचा जवळपास तीस हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. निवडणुक रिंगणातील तिसरे उमेदवार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे 2009 च्या निवडणुकीत भाजपाकडून लढताना राष्ट्रवादीचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्याकडून पराभूत झाले होते. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी शंकरराव गडाख यांनी थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवली. अडीच वर्षे मंत्रीपद मिळाल्यानंतरही ते ठाकरेंसोबत राहिल्याने त्यांच्याशिवाय दुसर्‍यांचा विचार होणे शक्यच नव्हते.

विरोधी पक्षातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता होती. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याशिवाय भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्या नावाचीही चर्चा होती. त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अब्दुल शेख यांचीही मागणी होती. शिंदे सेनेकडून उद्योजक प्रभाकर शिंदे यांच्या नावाची बरीच चर्चा होती. अखेरीस महायुतीने नाट्यमयरित्या विठ्ठलराव लंघे यांना शिंदे शिवसेनेत प्रवेश देवून त्यांना उमेदवारी दिली. तडकाफडकी बाळासाहेब मुरकुटे यांनी आ. बच्चू कडू यांची भेट घेवून त्यांच्या पक्षात प्रवेश करत प्रहार जनशक्तीची उमेदवारी मिळवली. त्याआधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळते का? याची शक्यताही त्यांनी पडताळून पाहिलेली होती, असे बोलले जाते.

आताच्या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे शंकरराव यशवंतराव गडाख, विठ्ठल वकिलराव लंघे तर बहुजन समाज पार्टीचे हरिभाऊ बहिरु चक्रनारायण हे तिघे रिंगणात आहेेत. या तिघांशिवाय नोंदणीकृत राजकीय पक्षांचे पोपट रामभाऊ सरोदे (वंचित बहुजन आघाडी) व बाळासाहेब दामोधर मुरकुटे (प्रहार जनशक्ती पार्टी) हे उमेदवार आहेत.

या उमेदवारांशिवाय 7 अपक्षही नशिब अजमावत असून त्यामध्ये ज्ञानदेव लक्ष्मण कांबळे (हंडीनिमगाव), जगन्नाथ माधव कोरडे (प्रवरासंगम), मुकूंद तुकाराम अभंग (कुकाणा), वसंत पुंजाहारी कांगुणे (बेलपिंपळगाव), शरद बाबुराव माघाडे (दिग्रस ता. राहुरी), सचिन प्रभाकर दरंदले (सोनई) व ज्ञानदेव कारभारी पाडळे (देवगाव) यांचा समावेश आहे. अशाप्रकारे एकूण 12 उमेदवार रिंगणात आहेत.

शंकरराव गडाखांच्या विरोधात विरोधकांचा एकच उमेदवार राहील असा अंदाज होता. मात्र तो फोल ठरला. यावरुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. पराभवाच्या धास्तीने गडाखांनी निवडणूक तिरंगी केली असल्याचा आरोप शिंदे शिवसेनेचे उमेदवार विठ्ठलराव लंघे यांनी केला. बाळासाहेब मुरकुटे यांनी याचा इन्कार केला व शनीशिंगणापूर येथे शनीचौथर्‍यावर जावून शनीशिळेवर हात ठेवून आपण कुठलीही सेटलमेंट केली नसल्याचा दावा करुन आपल्या उमेदवारीमागे इतर कोणीही नसल्याचे पटवून देण्याचा प्रयत्न केला. मुरकुटे यांच्या बंडखोरीमुळे भाजपातून त्यांची हकालपट्टी झाली.

सध्या निवडणूक प्रचाराचा धुराळा सुरु असून माजी आमदार मुरकुटे यांनी सुरुवातीलाच आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत मेळावा घेतला. प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी व भाजपातील त्यांच्या काही निवडक निष्ठावंतांच्या समवेत त्यांनी गाठीभेटींवर जोर दिला आहे. महायुतीचे उमेदवार विठ्ठल लंघे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेवाशात सभा घेतली. या सभेला मिळालेल्या प्रतिसादावरुन वातावरण तयार झाल्याचा दावा महायुतीचे कार्यकर्ते करत आहेत.

एका उमेदवाराने पक्षाचे नेते तर दुसर्‍या उमेदवाराने मुख्यमंत्र्यांची सभा घेवून वातावरण आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. तिसरे उमेदवार व विद्यमान आमदार शंकरराव गडाख निवडणुकीच्या आधीपासूनच घोंगडी बैठकांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संपर्क ठेवून होते. सध्याही ते याचपद्धतीने मतदारांशी संपर्क साधून प्रचार करत आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 14 तारखेला सभा होत आहे.

तिन्ही उमेदवारांचे कुटूंबीय निवडणुकीसाठी मेहनत घेत आहेत. गावोगाव प्रचार फेर्‍या काढून मतदारांची भेट घेवून त्यांना विनंती करत आहेत. शंकरराव गडाख यांच्यासाठी सुनीताताई गडाख, उदयन गडाख यांच्यासह सर्व कुटूंबीय मतदारांच्या भेटी घेत आहेत. लंघे यांच्या कन्या माजी जिल्हा परिषद सदस्या तेजश्री लंघे याही वडिलांच्या विजयासाठी गावोगाव मतदारांच्या भेटी घेत आहेत. एकूण नेवाशाच्या भूमीत ऐन थंडीत निवडणूक ज्वर वाढत असून शेवटच्या टप्प्यात जोरदार प्रचार सुरु आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या