कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
समाधानकारक पाऊस झाल्यामुळे सर्वच धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा (Water Storage) आहे. परंतु तापमानात झालेली वाढ पाहता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मागील वर्षी निळवंडे कालव्याच्या (Nilwande Canal) अधिकार्यांनी उत्तम नियोजन केल्यामुळे भर उन्हाळ्यात देखील लाभक्षेत्रात पाणी टंचाई जाणवली नाही. त्याच धर्तीवर यावर्षी देखील नियोजन करून निळवंडेचे पाणी लाभक्षेत्रातील प्रत्येक गावात पोहोचवा, अशा सूचना आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी अधिकार्यांना दिल्या.
निळवंडे कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाई (Water Shortage) जाणवू नये यासाठी योग्य नियोजन व्हावे याकरिता आ. काळे यांनी गुरुवारी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व शेतकर्यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी शेतकर्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यानंतर आ. काळे म्हणाले, निळवंडे कालव्याच्या आवर्तनातून लाभक्षेत्रातील सर्व बंधारे, पाझर तलाव, पाणी पुरवठा योजनांचे तलाव पूर्ण क्षमतेने भरुन द्या. वडझरी, बोडखे वस्ती, शेख वस्ती व हाडोळा पॉईंट या चारही एस्केपमधून पाणी सोडा तसेच भविष्यात आवश्यक त्या ठिकाणी एस्केपची निर्मिती करावी.
या बैठकीत त्यांनी निळवंडेच्या इंजिनिअर विभागाचे कार्यकारी अभियंता हापसे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क करून नियोजित वितरीकांचा आराखडा तयार करून त्या आराखड्यास मंजुरी घेण्याच्या सूचना केल्या. सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर कालव्यांवर तातडीने एस्केप तयार करून घ्यावेत. जेणेकरून भविष्यात प्रत्येकवेळी कालवे फोडण्याची वेळ येणार नाही व पाणी देतांना अडचणी येणार नाही. ज्या ठिकाणी पाणी पोहोचविण्यात अडचणी येतील व सांडवे उकरावे लागणार आहे त्या ठिकाणी आवश्यकता असल्यास जेसीबी, पोकलॅन मशीन उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले जाईल. मात्र पाण्याच्या बाबतीत नागरिकांच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घ्यावी.
यावेळी बाबुराव थोरात, रांजणगाव देशमुखचे सरपंच गजाजन मते, ज्ञानेश्वर गव्हाणे, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे संचालक संतोष वर्पे, संपतराव खालकर, निळवंडे पाटबंधारे विभागाचे अभियंता महेश गायकवाड, शाखा अभियंता साबळे आदी अधिकारी व लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.