अकोले |प्रतिनिधी| Akole
निळवंडे धरणातून 14 सप्टेंबरपासून सुरू असलेले भंडारदरा लाभक्षेत्राचे आवर्तन अखेर 41 दिवसांनंतर संपले. याकाळात धरणातून प्रवरा नदीपात्रात 4 हजार 586.89 दलघफू पाणी सोडण्यात आले. सध्या धरणात सुमारे 4841 दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. धरणाच्या निर्मितीनंतरचे हे सर्वाधिक काळ चाललेले आवर्तन असल्याचे मानले जात आहे.
पाण्याच्या उधळपट्टीबाबत ‘दैनिक सार्वमत’ने वारंवार आवाज उठविला होता. आवर्तन बंद करून अकोले तालुक्यातील उच्चस्तरीय कालव्याचे पाणी पुन्हा सुरू करावे, या मागणीसाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनीही आक्रमक भूमिका घेतली होती. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांना जाब विचारण्यात आला होता.
निळवंडे धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने 24 ऑक्टोबरला उच्चस्तरीय कालव्याचे आवर्तनही बंद करण्यात आले. या कालावधीत सुमारे 80 दलघफू पाणी वापरण्यात आले. या कालव्यांसाठी 274 दलघफू पाणी मंजूर आहे. आवर्तन पुन्हा सुरू करण्यासाठी भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याची गरज असून, तेथे सध्या 99.53 टक्के पाणीसाठा आहे.
बेपत्ता युवकाच्या शोधाला मदत होणार
सुगाव बुद्रुक येथे प्रवरा नदीत बुडालेल्या दोन युवकांपैकी बाळू शिंदे याचा मृतदेह पहिल्याच दिवशी सापडला होता. मात्र, आकाश पोपट पथवे याचा मृतदेह 54 तासांनंतरही सापडला नव्हता. निळवंडेचे आवर्तन संपल्याने नदीपात्रातील पाणीपातळी कमी होऊन शोधकार्यात मदत होण्याची शक्यता आहे.




