अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
निंबळक बायपास परिसरातील एका किराणा दुकानाच्या गोडाऊनचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने रोख रकमेसह काजू, बदाम, खाद्यतेलाचे डबे आणि एलईडी टीव्ही असा एकूण 88 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत बापू कोतकर (वय 42, रा. निंबळक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या निंबळक बायपास परिसरातील किराणा मालाच्या गोडाऊन मध्ये गुरुवार (दि. 29) रात्री 11.15 ते शुक्रवार (दि. 30) पहाटे 5.30 वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. रात्रीच्या वेळी दुकान बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
दुकानातील सहा हजार रुपये रोख रक्कम, 15 किलो बदाम, 15 किलो काजू, 15 किलो वजनाचे सोयाबीन तेलाचे 13 डबे, एक लिटरच्या तेलाच्या पिशव्या असलेले 17 बॉक्स आणि पाच हजार रुपये किमतीचा एलईडी टीव्ही असा एकूण 88 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. शुक्रवारी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. शुक्रवारी दुपारी या चोरीची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राकेश खेडकर पुढील तपास करीत आहेत.




