निफाड | प्रतिनिधी Niphad
कुंदेवाडी रेल्वे फाटकावर मालट्रकचा धक्का लागून करंजगाव येथील तीनवर्षीय बालक अंश निरभवणे जागीच ठार तर आजीच्या पायाला गंभीर जखमी झाली. दिपावली सणाच्या पुर्वसंध्येला ही दुदैवी घटना घडल्याने करंजगाव गावावर शोककळा पसरली आहे.
निफाड-पिंपळगाव बसवंत मार्गावरील कुंदेवाडी रेल्वे फाटकावर आज शनिवार (दि.१८) ऑक्टोबर सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास करंजगाव येथील शेतमजुरी करणारे भिमराव साहेबराव निरभवणे हे त्यांच्या आई लक्ष्मीबाई साहेबराव निरभवणे व पुतण्या अंश (वय ३) यास चाळीसगावला जाण्यासाठी कुंदेवाडी रेल्वे स्थानकावर त्यांच्या बजाज प्लॅटीना मोटारसायकल क्र. (एम.एच.१५ डी.ए.१२६०) या दुचाकीने करंजगाव येथून कुंदेवाडी येथे आले होते. ११.१५ वाजेच्या सुमारास रेल्वे फाटक उघडल्याने वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. निफाड व पिंपळगाव दोन्ही बाजुकडून वाहनांची प्रचंड गर्दी झाल्याने निरभवणे यांनी मोटारसायकल डाव्या बाजूला थांबवली होती.
पिंपळगावहून मालट्रक क्र. (सी.जी.०६ जी.क्यू ६६९५) हा ट्रक भरधाव वेगाने वाहनचालक मोहंमद महबुबार रहमद या पश्चिम बंगाल येथील वाहन चालकाने उभ्या असलेल्या निरभवणे यांच्या दुचाकीला धक्का मारल्याने मोटारसायकलवरून भिमराव निरभवणे यांचा तोल जावून निरभवणे, त्यांची आई लक्ष्मीबाई व पुतण्या अंश हे खाली पडून निरभवणे यांचा मोटारसायकलमध्ये पाय अडकला. तर लक्ष्मीबाई व अंश दोघे उजव्या बाजूला रोडवर पडल्याने मालट्रक अंशच्या डोक्यावरून व पायावरून गेला . लक्ष्मीबाई यांच्या उजव्या पायाची मांडी चिरून त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली.
वाहनांची व नागरिकांची गर्दी झाल्याने वाहनचालकाला पळून जाता आले नाही. नागरिकांनी लागलीच जखमी व मयत झालेल्या अंश ला रूग्णवाहिकेतून निफाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतू अवजड वाहन डोक्यावरून गेल्याने अंशचा जागीच मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. अंशच्या आजी लक्ष्मीबाई यांना पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले. शवविच्छेदन करून दुदैवी अंशचे पार्थीव कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. करंजगाव येथे शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निफाड पोलीस ठाण्यात संबंधित वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सांगळे तपास करत आहे.
उड्डाणपुलाचा प्रश्न एैरणीवर; लोकप्रतिनिधी कधी लक्ष घालणार!
निफाड तालुक्यातील अत्यंत रहदारीचा सुरत-शिर्डी-निफाड-पिंपळगाव हा महामार्ग क्र. २७ येथे कुंदेवाडी रेल्वे स्थानकावर पंधरा वर्षापासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. परंतू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे व आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित नेतृत्वामुळे आज एका निरागस बालकाला जीव गमवावा लागला. उड्डाणपूल याआधीच तयार करण्यात आला असता तर ही दुदैवी घटना घडली नसती. अजून किती बळींची वाट सार्वजनिक बांधकाम विभाग व शासन बघणार, असा संतप्त सवाल नागरिकांमधून होत आहे.




