नागपुर । Nagpur
मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराच्या आणि खाते बदलाच्या राजकीय गणितांची जुळवाजुळव सुरू असतानाच, दिल्लीच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात प्रभावी आणि ज्येष्ठ चेहरा मानले जाणारे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या एका विधानाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. “आता मी जास्त काम करू शकत नाही, नवीन पिढीला काम करण्याची संधी दिली पाहिजे,” या गडकरींच्या सूचक विधानामुळे त्यांच्या संभाव्य राजकीय निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.
नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे आयोजित ‘एकलव्य एकल विद्यालय शिक्षक – पर्यवेक्षक प्रशिक्षण वर्ग’ या कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी हे वक्तव्य केले. २०१४ पासून सलग मोदी सरकारमध्ये अत्यंत महत्त्वाचे खाते सांभाळणारे आणि देशभरात महामार्गांचे जाळे विणणारे ‘हायवे मॅन’ म्हणून ओळखले जाणारे गडकरी गेल्या तीन दशकांपासून सार्वजनिक जीवनात सक्रिय आहेत. मात्र, एनवेळी त्यांनी व्यक्त केलेली ही इच्छा राजकीय विश्लेषकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नितीन गडकरी यांच्या धोरणांवरून विरोधकांकडून सातत्याने निशाणा साधला जात आहे. विशेषतः इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत गडकरी अत्यंत आग्रही राहिले आहेत. मात्र, या मिश्रित इंधनामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी वाहनधारकांकडून सुरू झाल्या आहेत. या मुद्द्यावरून विरोधकांनी राजकीय वातावरण तापवले असतानाच, गडकरी यांचे हे आत्मपरीक्षणात्मक विधान समोर आल्याने अनेक तर्क-वितर्कांना जागा मिळाली आहे.
आपल्या बदलत्या दिनचर्येबद्दल मोकळेपणाने बोलताना गडकरी म्हणाले, “पूर्वी पक्षाचे काम करताना अगदी समोसे खाऊन कुठेही झोपायचो. पण कोरोनाच्या काळानंतर मी स्वतःला शिस्तीत आणले असून आता दररोज न चुकता योगा करतो. जर तब्येतच चांगली नसेल, तर मिळणारी सत्ता आणि पद काहीच कामाचे नसते.” या शब्दांत त्यांनी आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले.
सार्वजनिक जीवनातील आपल्या प्रवासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, त्यांनी अनेक चढ-उतार पाहिले आणि अनेक पुरस्कारही मिळवले. मात्र, देशातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांवर त्यांनी यावेळी तीव्र चिंता व्यक्त केली. आयुष्याच्या उर्वरित काळात राजकारणापेक्षा शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यासाठी मोठे काम करण्याची तीव्र इच्छा त्यांनी बोलून दाखवली. मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू असतानाच ज्येष्ठ मंत्र्याने दिलेले हे ‘मार्गदर्शक तत्त्व’ आणि नवी पिढी पुढे आणण्याचे केलेले आवाहन, आगामी काळात भारतीय राजकारणात मोठे फेरबदल घडवून आणणारे ठरेल यात शंका नाही.




