नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर मोठा निर्णय घेत बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. नबीन यांच्याकडे नेतृत्व दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ही नियुक्ती १४ डिसेंबर २०२५ पासून तात्काळ लागू झाली असून, बिहारसह राष्ट्रीय राजकारणात भाजपची रणनीती अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
नितीन नबीन आता जेपी नड्डा यांची जागा घेणार आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी त्यांच्या नियुक्तीविषयी माहिती दिली. अरुण सिंह यांनी पत्रकात म्हटले की, ‘भाजपच्या संसदीय बोर्डाने बिहार सरकारमघील मंत्री नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांची नेमणूक तातडीने करण्यात आली आहे’.
प्रशासकीय क्षमतेमुळे सोपवली जबाबदारी
पक्ष नेतृत्वाने नितीन नबीन यांचा संघटनात्मक अनुभव, स्थानिक पकड आणि प्रशासकीय क्षमता लक्षात घेऊन ही जबाबदारी सोपवली आहे. विशेष म्हणजे, याआधी जेपी नड्डा यांनाही राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यापूर्वी कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती, त्यामुळे नबीन यांच्या नियुक्तीकडे भविष्यातील मोठ्या भूमिकेचा संकेत म्हणून पाहिले जात आहे.
संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव
भाजपच्या संसदीय मंडळाच्या निर्णयानुसार ही जबाबदारी नितीन नबीन यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यांना संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव, पक्षातील दीर्घकाळची वाटचाल आणि प्रशासनावरील मजबूत पकड या बाबी लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांची निवड केली आहे. नितीन नबीन हे बिहार विधानसभेतील बांकीपूर मतदारसंघाचे आमदार आहेत. विद्यार्थी राजकारणापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली असून, भाजपमध्ये विविध संघटनात्मक पदांवर काम केले आहे.
जातीय समीकरण साधण्याचा भाजपचा प्रयत्न
भाजप संघटनेत ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून, आगामी राजकीय रणनीती आणि संघटनात्मक मजबुतीकरणाच्या दृष्टीने नितीन नबीन यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. भाजप कार्यकारी अध्यक्षपदासाठी गेल्या काही दिवसात अनेक नावांची चर्चा सुरू होती. अखेर आज झालेल्या या नियुक्तीमुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. नितीन नबीन यांच्या नियुक्तीमुळे भाजपने जातीय समीकरणे संतुलित करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. कायस्थ समाजातून येणारे नबीन हे भाजपचे जेष्ठ नेते नवीन किशोर सिन्हा यांचे पुत्र आहे.
कायस्थ समुदायातील अनेक नेत्यांना भाजपमध्ये उच्च पदांवर आणण्याची चर्चा बऱ्याच काळापासून सुरू आहे. शिवाय, आगामी पश्चिम बंगाल आणि २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत नितीन नबीन महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
शिस्तप्रिय संघटक
भाजपमध्ये नितीन नबीन यांची ओळख शिस्तप्रिय संघटक आणि जलद निर्णय घेणारे नेता अशी आहे. बिहार भाजपमध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या असून, राज्यातील संघटना मजबूत करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





