नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जगातील सर्वात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यास सुरूवात झाली आहे. विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी आणि संशोधन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो. २०२४ सालातील वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार व्हिक्टर ॲब्रोस आणि गॅरी रुवकुन या दोघांना मायक्रोआरएनएच्या शोधासाठी जाहीर झाला आहे. शरीरातील अवयवांचा विकास आणि त्याचे कार्य यासाठी हा शोध महत्त्वाचा आहे असे नोबेल कमिटीने म्हटले आहे.
व्हिक्टर ॲब्रोस आणि गॅरी रुवकुन यांनी मायक्रोआरएनएचा शोध लावला आणि ट्रांसक्रिप्शननंतर जीन एक्स्प्रेशनला रेगुलेट करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. या दोघांच्या शोधामुळे सजीवांचा विकास आणि कार्य करण्याच्या पद्धतीबद्दल महत्त्वाचे संशोधन झाले आहे.
गेल्या वेळी वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना मिळाले होते. नोबेल पारितोषिक देणाऱ्या समितीने सांगितले होते की, त्यांनी दिलेल्या mRNA तंत्रज्ञानाने बनवलेल्या कोरोना लसीमुळे जग कोरोना महामारीतून बाहेर येऊ शकते.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा