अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
घातक नायलॉन मांजाच्या वापरामुळे होणार्या दुर्घटनांना प्रतिबंध करण्याकरीता तसेच नायलॉन मांजाची वाहतुक, साठवणुक, विक्रीवर कारवाईसाठी जिल्हा पोलीस दल सरसावले आहे. जनतेकडून प्राप्त होणार्या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरावर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कारवाईचा आढावा घेण्याकरिता पोलीस अंमलदार नियुक्त केलेले आहेत.
दरम्यान, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, एलसीबी व सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना पोलीस ठाणे हद्दीत पथक कार्यान्वीत करून, नायलॉन मांजाचे विक्रेते व साठा वितरण करणार्या दुकानदारांवर छापे टाकून कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. आगामी मकरसंक्राती सणाच्या निमित्ताने पतंगबाजीमध्ये वापरण्यात येणार्या नायलॉन मांजाचा वापर होत असल्याने मनुष्य, पक्षी, प्राण्यांची जिवीत हानी, जखमी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. यामुळे पोलीस दलाने मोहिम हाती घेतली आहे.
स्थानिक गुन्हे शाखे मार्फत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय येथे जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाच्यावतीने नायलॉन मांजाबाबत तक्रार/ माहिती देण्याकरीता नागरिकांनी डायल 112 या क्रमांक किंवा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नायलॉन मांजाबाबत माहिती देणार्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. बेकायदेशीर नायलॉन मांजा विक्री, वाहतूक व साठवणूक यांचेबाबत नागरिकांनी माहिती द्यावी, असे आवाहन अधीक्षक ओला यांनी केले आहे.