मुंबई । Mumbai
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक न लढविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीतून त्यांनी माघार घेतली आहे. जरांगे पाटील विधानसभेच्या मैदानातून बाहेर पडताच ओबीसी नेते, लक्ष्मण हाके यांनी टीकास्र डागलं आहे.
‘बारामतीच्या स्क्रिप्टप्रमाणे जरांगे पाटील बोलतात. बारामतीतून जरांगेना आदेश गेला असावा म्हणून जरांगेंनी निवडणुकीतून पळ काढला.’, असे वक्तव्य लक्ष्मण हाकेंनी केले आहे. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या नावाचा देखील उल्लेख केला.
लक्ष्मण हाके म्हणाले, मी नेहमी सांगत आलो होतो की ते निवडणूक लढणार नाहीत किंवा सामोरे जाणार नाहीत. बारामतीच्या स्क्रिप्टनुसार ते वागत आहेत. जत्रा भरवणं सोप असतं लढणं अवघड असतं. जरांगे पाटील यांना गनिमी काव्याशिवाय पर्याय नाही. रणांगणामध्ये लढायला वाघाचे काळीज लागते. लोकसभेला बारामतीच्या सांगण्यावरून त्यांनी प्रचार केला.
तसंच, आज ओबीसी एकवटला त्यामुळे त्यांनी रणांगणातून माघार घेतली आहे. बारामतीकरांच्या सांगण्यावरून रणांगणातून त्यांनी माघार घेतली आहे. रणांगणांवर लढायला वाघाचं काळीज लागतं. गनिमी काव्याचा काळ गेला. दिवसाला भूमिका बदलणारा हा माणूस आहे. मुंबईला मोर्चा घेऊन गेले आणि मुंबईच्या वेशीवरून ते माघारी आले. जरांगे नावाच्या माणसाला संविधान, लोकशाही आणि निवडणुकीचा अभ्यास नाही. असे वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केले.