नाशिक । प्रतिनिधी
शासकीय आश्रमशाळांमधील वॉश प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी आदिवासी विकास विभाग, मंत्रालयातील पाणीपुरवठा तज्ज्ञ राजेंद्र कुमटगी, शेषराव कदम, युनिसेफचे संदीप तेंडोलकर यांनी इगतपुरी तालुक्यातील वैतरणा आणि टिटवे आश्रमशाळेस भेट दिली.
अडीच वर्षांपासून अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास विभाग नाशिक यांच्या कार्यक्षेत्रातील 172 आश्रमशाळांमध्ये वॉश (वॉटर, सॅनिटेशन आणि हायजीन) उपक्रम राबवण्यात येत आहे. हा प्रकल्प नॅशनल स्टॉक एक्स्चेंज फाऊंडेशनच्या निधीतून वॉटरएडमार्फत युनिसेफच्या सहकार्याने सीवायडीए, फिनिश सोसायटी, युवा या संस्थांकडून राबवण्यात येत आहे.
या प्रकल्पामध्ये नाशिक, अहमदनगर, धुळे आणि नंदुरबारमधील 172 आश्रमशाळांमध्ये तीन टप्प्यांमध्ये वॉशच्या विविध पैलूंवर काम केले जात आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात मुलांच्या व्यवहार परिवर्तनावर काम केले जात आहे व दुसर्या टप्प्यात नावीन्यपूर्ण मूलभूत सुविधा व हॅण्डवॉश स्टेशन, धोबीघाट, प्रसाधनगृहांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची सोय, घनकचरा व्यवस्थापन यावर काम केले जात आहे. तिसर्या टप्प्यात आश्रमशाळांच्या देखभाल दुरुस्तीवर भर देण्यात येत आहे.
या कार्यक्रमाची पाहणी करण्यासाठी शिष्टमंडळाने वैतरणा आणि टिटवे आश्रमशाळेेस भेट दिली. भेटी दरम्यान आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि मुलांसोबत संवाद साधला. भेटीदरम्यान प्रकल्पामधून बांधण्यात आलेल्या वैतरणा येथील प्लॅस्टिक बाटल्यांपासून तयार केलेले स्वच्छतागृह, टिटवे येथे सेप्टेज मॅनेजमेंटसाठी बांधलेल्या इव्हॅपोट्रान्सपिरेशन फिकल डायजेस्टरची प्रशंसा केली व अशी कामे इतर ठिकाणी करण्यासाठी शिफारस करू, असे आश्वासन दिले.