Friday, May 3, 2024
Homeनाशिकओझर ग्रामपालिकेची निवडणूक जाहीर

ओझर ग्रामपालिकेची निवडणूक जाहीर

ओझर । Ojhar (वार्ताहर)

ओझर ग्रामपलिकेचे नगरपरिषदेत रूपांतर होणार अशी घोषणा 4 डिसेंबरला शासनाने केल्याने पुढील प्रक्रियेला लागणारा वेळ लक्षात घेता तूर्तास ग्रामपलिकेची निवडणूक प्रक्रिया राबवावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. नगरविकास विभागाने नगरपरिषद अंमलात येणार असल्याचे न्यायलायसमोर स्पष्ट केल्याने तोदेखील मार्ग मोकळा झाला आहे.

- Advertisement -

राज्यातील 13 ग्रामपालिकेचे नगरपंचायत अथवा परिषदमध्ये रूपांतर करण्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु निवडणूक आयोगाने यावर्षीच्या एप्रिल ते डिसेंबर या कालावधीतील 14234 ग्रामपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यामुळे ओझरसह राज्यातील इतर गावांतील नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला.

त्यामुळे रूपांतरित ग्रामपालिकेच्या निवडणुका न घेता थेट त्या नगरपरिषदांच्या घ्याव्या, अशी याचिका माजी आ. अनिल कदम यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर मंगळवारी दुपारी 12 वाजता सुनावणी सुरू झाली. कोर्टाने नगरविकास विभागाचे म्हणणे मागवले. त्यात 13 पैकी ओझरची प्रक्रिया आधीच झाल्याने त्या प्रक्रियेला किमान दोन महिने लागतील तर इतर 12 गावांच्या प्रक्रियेला चार महिने लागतील, असे सांगण्यात आले.

परंतु तूर्तास जाहीर झालेल्या निवडणुका घ्याव्यात व ज्यावेळी नगरपरिषद म्हणून अंतिम प्रक्रिया राबवली जाईल तेव्हा तोदेखील निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे ओझर ग्रामपालिकेसाठी पॅनल निर्मितीला वेग आला असून ही निवडणूक तितकीच चुरशीची व अटीतटीची होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.

ग्रामपालिकेच्या निवडणुकीनंतर पुन्हा नगरपंचायतीच्या निवडणूक होईल. परंतु जेव्हा त्याचे रूपांतर नगरपरिषदेत होईल तो कार्यक्रम तेव्हा जाहीर होईल, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ओझर ग्रामपालिकेसाठी पॅनल निर्मितीला वेग आला असून ही निवडणूक तितकीच चुरशीची व अटीतटीची होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. माजी आ. अनिल कदम, जि. प. सदस्य यतीन कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे

नगरपरिषद अंमलात येणारच आहे; राज्य शासनाने नगरपरिषदेचे राजपत्र काढलेले असल्याने ती प्रक्रिया असे तशी सुरूच राहणार आहे. सध्या ग्रामपालिकेची निवडणूक होत असली तरी नगरपरिषद अंमलात येणारच आहे. सदर निवडणुकीवर होणारा दुप्पट खर्च पाहता ती दोन महिने पुढे ढकलण्यात यावी म्हणून याचिका दाखल केली होती. परंतु आता दोन्ही निवडणुका होतील इतकेच. यात कुणीही गैरसमज पसरवू नये.

अनिल कदम, माजी आमदार

नगरपरिषद निर्णयाचे आम्ही स्वागत केले होते; नगरपरिषद झाली तरी त्या निर्णयाचे याआधीच आम्ही स्वागत केले आहे आणि निवडणूक आयोगाच्या आदेशाने लागलेल्या ग्रामपालिकेच्या प्रक्रियेचेही आम्ही पालन करून लोकशाही पद्धतीने आम्ही सामोरे जाणार आहोत. नगरपरिषदेची वार्ता ही त्यांनीच आणली अन् ग्रामपालिकेच्या निवडणुकीस हरकत याचिकाही त्यांनीच दाखल केली. आमचा विरोध कधीच नव्हता.

यतीन कदम, जि. प. सदस्य

- Advertisment -

ताज्या बातम्या