पुणे | Pune
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कारभाराविरोधात पुण्यात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा आजचा ५ वा दिवस आहे. आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी राज्यातील विविध नेते भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहे. काल रविवारी आंदोलकांची भेट घेण्यासाठी संजय राऊत, अभिजित दिपके गेले होते. त्यासोबतच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर विद्यार्थ्यांची भेट घेण्यास गेले असता त्यांना आंदोलक विद्यार्थ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला. निंबाळकर आंदोलनस्थळी पोहोचून बोलण्यासाठी उभे राहताच काही विद्यार्थ्यांनी “ओमराजे परत जा”, “गो बॅक” आणि “गद्दार” अशा घोषणा दिल्या. या घोषणांमुळे काही काळ आंदोलनस्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्यांच्या भाषणादरम्यान घोषणाबाजी सुरूच राहिल्याने त्यांना आपले भाषण आटोपते घ्यावे लागले. त्यानंतर आंदोलनातील विद्यार्थी प्रतिनिधींनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
नेमका विरोध कशामुळे?
ओमराजे निंबाळकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला आहे. त्यामुळे आंदोलनस्थळी उपस्थित काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या पक्षांतराच्या मुद्द्यावरून सवाल उपस्थित केला. निंबाळकर भाषणाला उभे राहिल्यानंतर घोषणाबाजी करण्यात आली.
“ओमराजे असाच ओमराजे झाला नाही…”
पक्षांतराबाबत विद्यार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर निंबाळकर म्हणाले की, “ओमराजे असाच ओमराजे झाला नाही. खालून धडका घेऊन इथपर्यंत आलोय.” आपण 24 तास मतदारसंघासाठी काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यांनी पुढे आपल्या राजकीय निर्णयाचे समर्थन करताना मतदारसंघातील मागील निवडणुकांचा संदर्भ दिला. जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकांमध्ये आपल्या पक्षाचा अपेक्षित यश मिळाले नसल्याने पक्षांतराचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.घोषणाबाजीला उत्तर देताना निंबाळकर यांनी, “मी तुम्हाला पाठिंबा द्यायला आलो, तुमचे विषय मांडतोय, हे चुकलं का?” असा सवाल केला. आपण मतदारसंघात सातत्याने काम करत असून पक्षांतराचा निर्णय का घेतला, याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांसमोर भूमिका मांडली.
निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील प्रमुख मागणी असलेल्या MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले. “तुमचा विषय घेऊन मी स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटतो,” अशी भूमिका त्यांनी मांडली.
विद्यार्थ्यांनी मात्र अध्यक्षांच्या राजीनाम्याचा मुद्दा कायम ठेवत सरकारकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
अध्यक्षांच्या राजीनाम्याचा मुद्दा अद्याप कायम
सरकारने सचिवांच्या बदलीचा निर्णय घेतला असला तरी विद्यार्थ्यांचा MPSC अध्यक्षांच्या राजीनाम्याचा मुद्दा कायम आहे. राज्य सरकार किंवा राज्यपालांना MPSC अध्यक्षांना थेट पदावरून हटविण्याचा अधिकार नसून, संविधानाच्या कलम 317 अंतर्गत राष्ट्रपतींकडून कारवाई होऊ शकते, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पुण्यात MPSC संदर्भातील आंदोलनांमध्ये वेगवेगळ्या मागण्यांवर आधारित स्वतंत्र गटही दिसून येत आहेत. एका गटाची प्रमुख मागणी अध्यक्षांच्या राजीनाम्याची आहे, तर दुसऱ्या गटाकडून परीक्षा पुन्हा वस्तुनिष्ठ अर्थात MCQ पद्धतीने घेण्याची मागणी केली जात आहे. आणखी एका गटाकडून 2025 पासून लागू असलेली वर्णनात्मक पद्धत कायम ठेवण्याची मागणी केली जात आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप चॅनेलला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




