Thursday, June 4, 2026
HomeनगरShrirampur : कांद्याने आणले शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

Shrirampur : कांद्याने आणले शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

बाजारभावाचा फटका, उन्हाच्या तीव्र तडाख्याने साठवलेला कांदा लागला सडू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अवकाळी पाऊस, प्रखर उन्हाळा आणि घसरलेले बाजारभाव, गुणवत्तेच्या नावाखाली व्यापार्‍यांकडून कमी भाव व मजुरांच्या वाढलेल्या दरामुळे कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हतबल झाला आहे. यावर्षी कांद्याला चांगला दर मिळेल या आशेने कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी पोटच्या मुलासारखे कांद्याला जपले. मात्र, कांदा काढण्याच्या वेळी अवकाळी पावसाने जोराचा तडाखा दिल्याने कांद्याच्या पातीमध्ये पाणी गेल्याने कांदा जमिनीतच सडला तर शेतात कापून ठेवलेल्या कांदा पोळीमध्ये पाणी शिरल्याने काही कांदा जागेवरच सडला गेला. अवकाळीच्या तडाख्यामधून जो काही कांदा वाचला होता. तो कांदा काढण्यासाठी मजुरांची टंचाई असल्याने आवाचे सव्वा पैसे देऊन शेतकर्‍यांना कांदा काढावा लागला. कांदा गोण्याच्या दरातही वाढ झाल्याने तेथेही शेतकर्‍यांना आर्थिक फटका सहन करावा लागला.

- Advertisement -

निसर्गाच्या संकटातून वाचलेला कांदा शेतकर्‍यांनी विक्रीसाठी मार्केटमध्ये नेला असता तेथे व्यापार्‍यांकडून कांद्याच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित करत व्यापार्‍यांनी कमी दर दिला. किमान कांद्याच्या पैशातून केलेला सर्व खर्च निघून दोन पैसे हातात येतील अशी आशा बाळगून कांदा विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या शेतकर्‍यांच्या पदरी निराशा पडली. दिलेल्या कांद्यातून वाहतुकीचा खर्च निघून किरकोळ रक्कम शेतकर्‍यांच्या हातात पडल्याने शेतकरी हातबल झाला.

कांद्याला आज ना उद्या चांगला दर मिळेल या अशाने सध्या ज्या शेतकर्‍यांकडे कांदा साठवणुकीसाठी व्यवस्था उपलब्ध आहे अशा शेतकर्‍यांनी कांदा चाळीमध्ये कांदा साठवण्यास सुरुवात केली आहे. मात्र उन्हाच्या तीव्र झळांमुळे कांद्याची चाळी अक्षरशः तापल्या असून त्याचा थेट परिणाम कांद्याच्या गुणवत्तेवर होत आहे. अनेक ठिकाणी कांदा सडत असून दिवस-रात्र मेहनत करून जपलेला कांदा हातातून निसटताना पाहून शेतकर्‍यांची मानसिक स्थिती बिकट झाली आहे. कांदा विकावा तर भाव नाही आणि साठवून ठेवावा तर सडतो, अशा संकटात शेतकरी अडकला आहे.

अनेक शेतकर्‍यांनी कर्ज काढून कांद्याची लागवड केली मात्र, नैसर्गिक संकटांमुळे आणि बाजारातील अस्थिरतेमुळे शेतकर्‍यांच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. बँकांचे कर्ज, खासगी सावकारांचे वाढते व्याज आणि घर खर्च यांचा ताळमेळ बसवताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. नैसर्गिक आपत्ती आणि बाजारातील अस्थिरता यामध्ये भरडल्या जाणार्‍या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना सरकारने दिलासा देणे गरजेचे आहे.

शासन सोयाबीन, कपाशीसारख्या पिकांना नुकसान भरपाई अनुदान देते. तशी नुकसान भरपाई कांदा पिकाला मिळावी. कांद्याला एकरी 70 हजार ते एक लाखापर्यंत खर्च येतो. एवढा मोठा खर्च करून जर त्याच्या शेतकर्‍यांच्या पदरी काहीच मिळत नसेल. तर शेतकरी नक्कीच नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. शेतकर्‍यांना सरकार शिवाय दुसरे कुणी वाली नाही. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना सासनाने दिलासा द्यावा.
– नानासाहेब पवार, प्रगतशिल शेतकरी खिर्डी

विक्रीसाठी नेलेल्या कांद्याला ग्राहक भेटेना
अवकाळीमध्ये सापडलेला कांदा आणि उन्हाची सध्याची तीव्रता यामुळे कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढले आहेत. कांदा खरेदी करताना वरून कांदा हा खूप चांगला वाटतो. मात्र, खरेदी करून तो विकण्यासाठी नेला असता चार ते पाच दिवसांमध्ये वाहतूक करणार्‍या वाहनामध्ये खराब होऊन गोण्यातून पाणी बाहेर येत आहे. त्यामुळे विक्रीसाठी नेलेल्या कांद्याला ग्राहक भेटत नसल्याने खराब झालेला कांदा फेकून देण्याची वेळ व्यापार्‍यांवर येत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांवर व व्यापार्‍यांवर आलेले हे संकट आहे. मात्र, पुढील काही दिवसांमध्ये कांद्याच्या भावामध्ये वाढ होऊ शकते.
– नवनाथ सलालकर, कांदा व्यापारी

कांदा तेजीत येणार
जिल्ह्यातून एकाच वेळी सर्व कांदा हा विक्रीसाठी बाहेर आला आहे. अवकाळी पावसामुळे कांदा खराब असल्याने यावर्षी व्यापार्‍यांनी जागेवर कांदा खरेदी केला नाही. मात्र, आता व्यापारी जो कांदा खरेदी करत आहे. तो कांदा चार ते पाच दिवसांनी दक्षिण भारतात जातो. पाच दिवस कांदा वाहनामध्ये असल्यामुळे कांद्याच्या गोण्यातून पाणी बाहेर निघून कांदा खराब होत आहे. त्यामुळे व्यापार्‍यांना तेथे ग्राहक मिळत नाही. अवकाळी पावसामध्ये झोडपलेला कांदा जोपर्यंत संपत नाही. तोपर्यंत कांद्याच्या भावामध्ये वाढ होणं शक्य नाही. मात्र येत्या काही दिवसांमध्ये कांदा तेजीमध्ये राहील.
– साहेबराव वाबळे, सचिव, बाजार समिती श्रीरामपूर

ताज्या बातम्या

Shrirampur : श्रीरामपुरात एटीएसची छापेमारी; चौघांची चौकशी

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur शहरात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दाखल होत कारवाई केली, शहराच्या विविध भागांतील सात ते आठ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. सोशल मीडियाच्या...