Thursday, May 7, 2026
Homeनगरघट अन् कपातीच्या नावाखाली कांदा उत्पादकांची व्यापार्‍याकडून लुट

घट अन् कपातीच्या नावाखाली कांदा उत्पादकांची व्यापार्‍याकडून लुट

माळवाडगाव |वार्ताहर| Malwadgaon

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील काही आडतदार व्यापारी कांद्याचे बाजारभाव पडलेले असल्याने शेतावर 9 ते 10 रुपयाने कांदा खरेदी करत असून घसरलेल्या दराबाबत शेतकर्‍यांचे दुमत नाही. मात्र, पट्टी देताना एका गोणीमागे 1 किलो घट अन् पेमेंट मधून 2 टक्के कपात करून मनमानी करत आहे. या कपातीच्या नावाखाली शेतातील कांदा भराई, मजुरी खर्च एकप्रकारे शेतकर्‍यांच्याच पट्टीतून काढताहेत. या कपातीमुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

मागील हंगामात चाळीत साठवून ठेवलेला कांदा डिसेंबर अखेर बाजारात विक्री करूनही भाव वाढले नाही. म्हणून बहुतांश शेतकर्‍यांनी फेब्रुवारी महिन्यात बर्‍यापैकी बाजार असतात म्हणून आगस कांदा लागवड केली. परंतु फेब्रुवारी अखेर अन् मार्च पहिल्या आठवड्यात कांदा बाजार भाव गडगडले असल्याने शेतकर्‍यांनी जागेवर मिळेल त्या भावात व्यापार्‍यास कांदा देणे पसंत केले. जागेवर ठरलेला सौदा शेतकरी मान्य करत आहे. परंतु क्विंटलमागे 2 किलो घट अन् पेमेंट मधून 2 टक्के कपात शेतकर्‍यांना मान्य नाही.

माळवाडगाव येथील एका शेतकर्‍याने व्यापार्‍याच्या अधिकृत एजंटच्या साक्षीने व्यापार्‍यास शेतावरच कांदा दिला. मध्यस्थ एजंटने सांगितले दहा टनामागे दोन क्विंटल घट अन् लाखांच्या पुढे पेमेंट गेल्यास लाखामागे 2 टक्के कपात असे सांगून पंचक्रोशीतील बहुतांश शेतकर्‍यांचा कांदा खरेदी केला. लाखांच्या पुढे पेमेंट असल्यास 2 टक्के वटाव असे मध्यस्थ एजंटने शेतकर्‍यांना सांगितले. परंतु पेमेंट देताना व्यापार्‍याने लाखांच्या आतील पेमेंट मधूनही 2 टक्के कपात केली. बोलीप्रमाणे लाखांच्या आत पट्टीला 2 टक्के वटाव लावू नका अशी विनंती शेतकर्‍यांनी केली. ज्याच्याबरोबर सौदा बोली केली त्यांच्याकडून पेमेंट घ्या, आमच्याकडून 2 टक्के कपात टाळायची असेल तर 21 दिवसाने पेमेंट मिळेल, असे सांगण्यात येते. एकंदरीत व्यापार्‍यांकडून संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकर्‍यांना खिंडीत पकडण्याचा हा प्रकार सुरू आहे.

सहा दिवस उन्हात गोण्या पडून, अखेर घोडेगावी कांदा विकून धन्याने व्यापार्‍यास घडविली अद्दल
माळवाडगाव येथील एका शेतकर्‍याचा 300 गोणी कांदा 10 रूपये दराने श्रीरामपूरच्या व्यापार्‍यास जागेवर दिला. परिसरातील कांदा खरेदी व्यापारी एका मध्यस्थामार्फत करत असून त्यास गोणीमागे 10 रूपये कमिशन ठरलेले आहे. व्यापारी शेतकर्‍यांच्या कांदा शेताकडे फिरकत देखील नाही.तब्बल 5 दिवस 300 गोणी कांदा शेतात उन्हात तळपत असल्याने, वजनात दररोज येणारी घट लक्षात घेऊन या शेतकर्‍याने रात्रीतून दोन डबल ट्रेलर ट्रॅक्टरने कांदा घोडेगाव बाजारात विकून टाकला. सौदा केलेला मध्यस्थ गोण्या व भराई खर्च मागण्यास शेतकर्‍यांकडे आला असता, उन्हात झालेल्या वजनातील घटमध्ये हिसाब बराबर झाल्याचे माल धन्याने उत्तर दिले.

ताज्या बातम्या