अहिल्यानगर (प्रतिनिधी)
राज्यात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, यामागे आखाती देशांतील युध्दजन्य परिस्थिती आणि जागतिक व्यापारातील अनिश्चितता कारणीभूत असल्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी म्हटले आहे. निर्यातबंदी नसतानाही हॉर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला असून मुंबई बंदरात मोठ्या प्रमाणात माल अडकून पडल्याची माहिती त्यांनी दिली.
अहिल्यानगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री विखे म्हणाले, सरकारने कांदा निर्यातीवर कोणतीही बंदी घातलेली नाही. मात्र आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युध्दजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जगाचे अर्थकारण हॉर्मुझ सामुद्रधुनीवर येऊन ठेपले आहे. मुंबई बंदरात मोठ्या प्रमाणात शेतीमाल पडून आहे. कांद्याचे दर कोसळणे ही अत्यंत चिंतेची बाब असून सरकार याबाबत सकारात्मक विचार करेल. ते पुढे म्हणाले की, जागतिक परिस्थितीचा थेट परिणाम भारतातील शेतीमाल व्यापारावर होत आहे. विशेषतः मध्यपूर्व देशांमध्ये होणार्या निर्यातीला फटका बसत असल्याने कांद्याच्या बाजारभावात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून केंद्र व राज्य सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरून विरोधकांनी केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केल्यानंतर मंत्री विखे यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. इराण-अमेरिका संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात इंधन दर वाढले आहेत. राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विचारावे की, त्या देशात पेट्रोलचे दर किती टक्क्यांनी वाढले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध माध्यमांतून देशातील इंधनपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला असून दर नियंत्रणात राहावेत यासाठीही प्रयत्न सुरू असल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले. विरोधकांना निवडणुकांमध्ये अपयश आल्याने ते जनतेची दिशाभूल करण्यासाठी आरोप करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनालाही मंत्री विखे यांनी समर्थन दिले. सरकार परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र जनतेनेही आता काटकसर करण्याची गरज आहे. कोविड काळात 40 लोकांमध्ये लग्न समारंभ होत होते, आता मात्र लग्नांमध्ये हजारोंची गर्दी आणि शेकडो गाड्यांचा ताफा दिसतो. बदललेल्या परिस्थितीत सर्वांनी जबाबदारीने वागण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन त्यांनी केले.




