Saturday, June 13, 2026
HomeनगरOnion News : कांद्याने आणले शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

Onion News : कांद्याने आणले शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

एकरुखे |वार्ताहर| Ekrukhe

कांद्याच्या दरातील भीषण घसरणीमुळे सध्या बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आले आहे. एकेकाळी हमखास फायदा देणारे पीक म्हणून मानला जाणारा कांदा आता मातीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कांदा लावणीपासून ते काढणीपर्यंत एकरी 60 ते 65 हजार रुपये खर्च येतो, मात्र बाजारभावातून हा खर्च निघणेही आता कठीण झाले आहे.

- Advertisement -

सध्या बाजारपेठेत व्यापार्‍यांची मनमानी सुरू असल्याचे चित्र आहे. शेतकरी कांदा विक्रीसाठी व्यापार्‍यांना फोन करत आहेत, मात्र अनेक व्यापारी फोन उचलण्यास तयार नाहीत. जर चुकून फोन उचललाच, तर लेबर उपलब्ध नाही किंवा बाहेरगावी आहे अशी उत्तरे देऊन टाळाटाळ केली जात आहे. एखादा व्यापारी खरेदीसाठी आलाच, तर तो थेट 3 रुपये किलो या दराने मागणी करत आहे. विशेष म्हणजे, कांदा भरण्यासाठी लागणारी एक रिकामी गोणी आज 50 ते 55 रुपयांना मिळत आहे. अशा परिस्थितीत कांद्याची विक्री करायची कशी, असा सवाल शेतकरी विचारत आहेत.

व्यापार्‍यांकडून सध्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्यात बंद आहे किंवा मागणी घटली आहे अशी कारणे दिली जात आहेत. मात्र हे वास्तव संशयास्पद वाटते. कारण जो कांदा शेतकर्‍यांकडून 2 ते 3 रुपये किलोने घेतला जातो, तोच कांदा सर्वसामान्यांना बाजारात 20 ते 25 रुपये किलो दराने खरेदी करावा लागत आहे. या तफावतीमुळे शेतकरी कंगाल होत असून मधले दलाल आणि व्यापारी मात्र मालामाल होत आहेत. जेव्हा कांद्याचे भाव वाढतात, तेव्हा शहरातील नोकरदार वर्ग आणि प्रसारमाध्यमे महागाईचा आरडा-ओरडा करतात. मात्र, आज जेव्हा शेतकरी देशोधडीला लागला आहे, तेव्हा ही माध्यमं कुठे आहेत? असा प्रश्न शेतकरी बांधवांकडून उपस्थित केला जात आहे. हवामानाचा फटका आणि दरातील घसरण यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, सरकारने या गंभीर परिस्थितीत तात्काळ हस्तक्षेप करून दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

नाशिक जिल्ह्यात दोन महत्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ

0
नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik राज्यातील रोजगार, बेरोजगारी, महिला कामगार सहभाग तसेच असंघटित क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांची अद्ययावत व विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर...