नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ (Punyashlok Ahilyadevi Holkar Farmers Loan Waiver Scheme) अंतर्गत नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची यादी (Farmer List) शुक्रवार (दि.२४) रोजी प्राप्त झाली आहे. संबंधित विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे कार्यालय, संस्थांचे सचिव तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमध्ये ही यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांकडे अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अॅग्रीस्टॅक नोंदणी केलेली नाही, त्यांनी तातडीने जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र (Aaple Sarkar Seva Kendra) किंवा सीएससी केंद्रावर जाऊन नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच कर्जमाफीचा लाभ मिळविण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी यादीतील आपले नाव तपासून जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र किंवा बँकेच्या शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करून घेणे आवश्यक आहे. यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र, सीएससी केंद्र आणि बँकेच्या शाखांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी सांगितले की, आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य असून कोणत्याही केंद्रावर या प्रक्रियेसाठी लाभार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी कोणालाही कोणतीही रक्कम देऊ नये आणि शासनाने निश्चित केलेली प्रक्रिया पूर्ण करून कर्जमाफी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.




