Friday, May 3, 2024
Homeनाशिकप्रतिबंधाच्या केवळ घोषणाच...

प्रतिबंधाच्या केवळ घोषणाच…

नाशिक l Nashik (खंडू जगताप)

शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा प्रसार गुणाकाराच्या प्रमाणात होताना दिसत आहे. शहरांबरोबरच आता ग्रामिण भागातही हा विस्फोट झाला आहे. असे असताना जिल्हा प्रशासन व सबंधित विभागांकडून जी पूर्वीप्रमाणे कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, ती होताना दिसत नाही.

- Advertisement -

केवळ आदेशावर आदेश काढण्यातच प्रशासन धन्यता मानत आहे. तसेच केवळ लॉकडाऊनच्या धमक्या देण्यात येत आहेत. शहरात आतापर्यंत 21 हजार भाग प्रतिबंधित म्हणून जाहीर झाले. त्यातील 1091 क्षेत्रे सध्या अस्तित्वात आहेत.

प्रतिबंधित क्षेत्रात जाणार्‍या रस्त्यावर वाहनांना ये-जा करता येईल, या प्रकारे लावलेली लोखंडी जाळी, प्रतिबंधित इमारतीसह भागातून खुलेपणे होणारी भटकंती आणि नियमांची अंमलबजावणी, देखरेखीसाठी अस्तित्वात नसलेली यंत्रणा.. हे चित्र शहरातील सर्व प्रतिबंधित क्षेत्राचे आहे. अधिक रुग्ण आढळलेल्या भागात ही स्थिती आहे. तर उर्वरित क्षेत्रात प्रशासन काय दिवे लावते आहे, याबाबत न बोललेलेच बरे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेत शहरात संसर्ग अतिशय झपाट्याने पसरत आहे. सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी करण्यासाठी अनेक निर्बंध घातले. मास्क नसणारे, सुरक्षित अंतराचे पथ्य पालन न करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू आहे. प्रतिबंधित क्षेत्रात नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निश्चित झाले होते.

या क्षेत्रात पोलीस, पालिका पथकांमार्फत नजर ठेवली जाणार होती. बाधितांसह त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या हातावर शिक्के मारणे, त्यांना बाहेर फिरण्यास प्रतिबंध करण्याचे नियोजन झाले. कोणी फिरताना आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला गेला. अशा प्रशासकीय पातळीवर घोषणा बर्‍याच झाल्या असल्या तरी प्रतिबंधित क्षेत्रात प्रत्यक्षात वेगळीच स्थिती आहे.

शहरात बहूतांश ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्राचे फलक लावले दिसतात खरे, परंतु तेथून कोणी बाहेर पडणार नाही याची दक्षता बाळगणे गरजेचे आहे. मात्र या प्रतिबंधित इमारतींतून रहिवासी वा घरकाम करणार्‍या महिला, नातेवाईक, मित्र परिवार सहज ये-जा करतात. अशा इमारतींकडे जाणार्‍या रस्त्यावर लोखंडी जाळी आणि फलक लावलेला आहे.

जाळ्या अशा लावल्या आहेत की, पादचारी आणि दुचाकी, चारचाकी वाहनधारक सहजपणे मार्गक्रमण करू शकतील. या ठिकाणी देखरेख ठेवण्यासाठी कोणी नसते. यामुळे स्थानिकांना सहजपणे वावर करता येतो. एखादा बाधित बाहेर फिरून आला तरी कोणाला समजणार नाही. परिसरात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.

परंतु त्यांच्या नावाखाली आईस्क्रीम पार्लर तसेच स्वीटची दुकानेही उघडी दिसत आहेत. ही अत्यावाश्यक सेवेत मोडतात का याचा तरी खुलासा प्रशासनाने करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पहिल्या लाटेत सुरुवातीला आरोग्य विभागाच्या बरोबरच पालिका, पोलीस यंत्रणा सक्रिय होती. रुग्ण आढळल्यानंतर परिसराचे निर्जंतुकीकरण, क्षेत्रातून कोणी बाहेर पडणार नाही, याची कडेकोट व्यवस्था केली जायची. काळ पुढे सरकला, तशी यंत्रणा ढेपाळली. नंतर तर रुग्ण सापडले तरी निवासस्थान परिसरात निर्जंतुकीकरण केले जात नव्हते. दुसर्‍या लाटेत प्रतिबंधित क्षेत्रात कडक नियमावलीचे कागदी घोडे नाचत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.

प्रतिबंधित क्षेत्रात नियमावलीची अंमलबजावणी होत नसल्याच्या मुद्यावर महापौरांनी या संदर्भात पोलीस आणि महापालिकेला वारंवार सूचना देण्यात आल्याचे नमूद केले. पोलिसांकडे राज्य राखीव पोलीस दलास पाचारण करण्याची मागणी केली होती. पोलिसांचे अस्तित्व दिसल्यास नियमावलीची अंमलबजावणी होण्यास मदत होईल.

जादा दंड आकारून शिस्त लावता येईल, असे पर्याय सुचविल्याचे त्यांनी नमूद केले मात्र पोलिसांनी त्या त्या पोलीस ठाण्यांवर त्या भागातील परिस्थिती सोडून दिली आहे. सध्या करोनाबाधित पोलिसांचीच जिल्ह्यातील आकडेवारी 50च्या पुढे गेली आहे.

सध्याचे अधिकारी पहिल्या प्रमाणे रिस्क घेण्यास तयार नाहीत. आता पोलीस शिपाई गमवायचे नाहीत, असे स्पष्ट सांगण्यात येत आहे. परंतु नागरिकांना पोलीसांशिवाय इतर कोणाचीही भीती वाटत नाही, हेही तितकेच सत्य आहे.

रुग्णसंख्या पावणेदोन लाखांवर

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा कहर सुरू असून दररोज सुमारे चार ते 5 हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. यात नाशिक शहरातील सरासरी दोन ते अडीच हजार रुग्णांचा समावेश आहे. त्याच बरोबरीने ग्रामिण भागातीलही रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत बाधित होणार्‍यांची संख्या 1 लाख 71 हजारांच्या पुढे आहे.

त्यातील 1 लाख 43 हजार रुग्ण बरे झाले. 2308 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या जवळपास 28 हजार रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात आतापर्यंत 20 हजार 875 भाग प्रतिबंधित म्हणून जाहीर झाले. त्यातील 1087 क्षेत्रे सध्या अस्तित्वात आहेत. यामध्ये 1074 सूक्ष्म तर 13 अतिसूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या