अहिल्यानगर (प्रतिनिधी)
राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या सूचनेनुसार राबविण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘ऑपरेशन शोध-खत’ या विशेष मोहिमेत अहिल्यानगर जिल्हा पोलिसांनी उल्लेखनीय यश मिळवत एकूण 98 बेपत्ता बालकांचा शोध लावला आहे. शोधण्यात आलेल्या सर्व बालकांना आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
8 ते 23 जून 2026 या कालावधीत ही विशेष मोहीम जिल्हाभर राबविण्यात आली. हरवलेल्या अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना सुरक्षितपणे कुटुंबीयांपर्यंत पोहोचविणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता. या मोहिमेसाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयांतील विशेष पथके तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांनी समन्वयाने काम केले. मोहिमेदरम्यान 90 मुली आणि 8 मुले, अशा एकूण 98 बेपत्ता बालकांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. या सर्वांची आवश्यक कायदेशीर पडताळणी आणि प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांच्या व नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
अल्पवयीन मुलांचे अपहरण, बेपत्ता होण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि हरवलेल्या बालकांचा वेगाने शोध घेण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष मोहिमा भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी त्यांच्या परिसरात कोणतेही बेपत्ता बालक आढळल्यास किंवा संशयास्पद माहिती मिळाल्यास ती तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
ही मोहीम पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे आणि त्यांच्या पथकाने या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.
विशेष पथकांकडून शोध
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पोलिसांनी गोपनीय माहिती संकलन, तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्याचा वापर तसेच इतर जिल्ह्यांतील पोलिसांशी प्रभावी समन्वय साधला. प्रत्येक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि पोलीस ठाण्याने स्वतंत्र विशेष पथके तयार करून शोधमोहीम राबविली. त्यामुळे कमी कालावधीत मोठ्या संख्येने बेपत्ता बालकांचा शोध घेणे शक्य झाले.




