Sunday, May 5, 2024
HomeUncategorizedभारतीय औषध उद्योग विस्तारण्याची संधी

भारतीय औषध उद्योग विस्तारण्याची संधी

प्रा. डॉ. मिलिंद वाघ, उपप्राचार्य, मविप्र औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय

औषधनिर्मिती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या भारताला औषधांच्या संशोधन क्षेत्रावर जास्त भर आगामी दोन दशकांत द्यावा लागेल. ‘करोना’ विषाणू विरोधातील लस संशोधित करण्यास ऑक्सफर्ड विद्यापीठाने आज जगभरात आघाडी घेतली आहे. या प्रकारची संशोधनातील आघाडी नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ 25 वर्षांनी तरी घेऊ शकेल का? देशातील औषधनिर्मिती क्षेत्राचे चित्र बदलायचे असेल तर शिक्षण आणि संशोधनावर जीडीपीच्या किमान सहा टक्के खर्च करावा लागेल

- Advertisement -

73 वर्षांपूर्वी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यावेळी देश औषधांच्या बाबतीत स्वयंपूर्ण नव्हता. अनेक औषधे आपल्याला महागड्या किमतीत आयात करावी लागत. आज आपण औषधनिर्मितीत स्वयंपूर्ण आहोत. औषधांची आयात न करता जगाला मोठ्या प्रमाणात औषधे निर्यात करतो. ‘नेट फॉरेन एक्स्चेंज अर्नर’ म्हणून आज भारतीय औषध उद्योगाला भारताच्या आर्थिक क्षेत्रात मानाचे स्थान आहे.

नाशिक जिल्ह्यात मायलन, ग्लॅक्सो, ग्लेनमार्कसारख्या अनेक औषध उत्पादक कंपन्या आहेत. दर्जेदार औषधांची निर्यात या कंपन्या अमेरिका आणि युरोपसारख्या पुढारलेल्या राष्ट्रांना करतात. ‘करोना’ महामारीशी झुंज देत असताना जगातील सर्व देशांत आज ‘करोना’ प्रतिबंधक लसीच्या निर्मितीची आतूरतेने वाट पाहिली जात आहे. या लसीची जगात सर्वात जास्त प्रमाणात उत्पादन करण्याची क्षमता असलेली ‘सेरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ ही अदर पूनावाला या महाराष्ट्रीयन व्यक्तीची कंपनी नाशिकपासून 200 कि.मी.वर पुण्यात आहे. पुढील 25 वर्षांत भारतीय औषध उद्योगाने कुठल्या दिशेने आणि कुठपर्यंत वाटचाल केलेली असेल?

संशोधनावर भर

आज औषधनिर्मिती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या भारताला औषधांच्या संशोधन क्षेत्रावर जास्त भर आगामी दोन दशकांत द्यावा लागेल. ‘करोना’ विषाणू विरोधातील लस संशोधित करण्यास ऑक्सफर्ड विद्यापीठाने आज जगभरात आघाडी घेतली आहे. या प्रकारची संशोधनातील आघाडी नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ 25 वर्षांनी तरी घेऊ शकेल का? या प्रश्नाचे उत्तर आज तरी फारसे आशादायक नाही.

कारण आपली विद्यापीठे आणि खास करून आरोग्य विज्ञान विद्यापीठ केवळ परीक्षा घेण्यापुरते आणि विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत लावण्याची कसरत करण्यापर्यंतच मर्यादित झाले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या परांपरागत विद्यापीठात जेवढे संशोधन आरोग्य क्षेत्रात चालते तेवढे संशोधनसुद्धा आज नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात होत नाही. हे वास्तव बदलायचे असेल तर शिक्षण आणि संशोधनावर जीडीपीच्या किमान सहा टक्के खर्च करावा लागेल. हे शक्य होईल का? तसे झाले नाही तर भारतीय औषध उद्योग जागतिक भरारी घेऊ शकणार नाही.

विद्यापीठ-कंपन्या सहकार्य ऑक्सफर्ड विद्यापीठाने ‘करोना’वरील लस संशोधनासाठी ‘अ‍ॅस्ट्रॉ झेनेका’ या स्विडीश-ब्रिटीश औषध कंपनीसोबत करार केला आहे. अशा प्रकारचे संशोधन करार भारतीय विद्यापीठे आणि भारतीय औषध कंपन्यांमध्ये झाले तर 25 वर्षांनंतरचे भारतीय औषध उद्योग क्षेत्राचे चित्र अधिक आत्मनिर्भर आणि उज्ज्वल असेल. संशोधनावर भरभक्कम खर्च करण्यासाठी भारतीय औषध कंपन्यांना अधिक मोठे व्हावे लागेल. आत्मनिर्भरता म्हणजे स्वमग्नता आणि आपल्या अस्मितेवर वाजवीपेक्षा जास्त प्रेम करणे नव्हे, हेही समजून घ्यावे लागेल.

इतर देशातील कंपन्या अगदी चिनी कंपन्यांबरोबरसुद्धा सहकार्याचे करार करावे लागतील. बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या दोन ज्ञानशाखांचा फार मोठा प्रभाव औषधांच्या क्षेत्रावर पडेल. या दोन्ही क्षेत्रात भारत किती मूलभूत संशोधन करतो त्यावर भारतीय औषध उद्योगाचे भवितव्य अवलंबून आहे. आयटी क्षेत्रावर आधारित फार्माकोव्हिजिलन्स क्षेत्रा4तील टीसीएस, कॉग्निझंट, स्प्रिंगर-नेचर यांसारख्या मोठ्या कंपन्या आज अंदाजे पाच हजार तरुण तंत्रज्ञांना पुण्यात रोजगार उपलब्ध करून देत आहेत. नाशिकमध्ये मात्र अशा प्रकारच्या औषध कंपन्यांचा फारसा विस्तार झालेला आढळत नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या