अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कांदा पिकाची लागवड झालेली नसतानाही विमा काढल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता फळबागा नसतानाही विमा काढल्याचा प्रकार जिल्ह्यात समोर आला आहे. दोन हजार 55 ठिकाणी फळबागा नसताना व 669 ठिकाणी फळबागा लागवडीपेक्षा जास्त क्षेत्राचा विमा काढल्याचे कृषी विभागाने केलेल्या तपासणीतून स्पष्ट झाले आहे. दोन हजार 724 शेतकर्यांनी यासाठी अर्ज केले होते. हे प्रकरण उघड झाल्यामुळे शासनाचे 89 लाख 44 हजार रुपयांची रक्कम वाचली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी ही माहिती दिली.
चार दिवसांपूर्वीच कृषी विभागाने कांद्यातून शेतकर्यांनी पीकविमा लाटण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. आता तो प्रकार फळबाग लागवडीत देखील झाल्याचे समोर आले आहे. सन 2024-25 या वर्षात जिल्ह्यातील 13 हजार 85 शेतकर्यांनी फळबाग लागवडीसाठीच्या विम्यासाठी सहभाग नोंदविला असून 7 हजार 515.24 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे. 26 जुलै 2024 रोजी पुण्यात कृषी विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठीत पुनर्रचित हवामान आधारित फळ व पीक विमा योजनेत मागील तीन वर्षामध्ये आढळून आलेल्या बोगस अर्जाची संख्या पहाता फळबाग नोंदणी केलेल्या सर्व क्षेत्राची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील 14 तालुक्यात कृषी विभागाने केलेल्या तपासणीतून 2 हजार 25 ठिकाणी एक हजार 62.3 हेक्टर क्षेत्रावर फळबागा नसतानाही विमा उतरविल्याचे आढळून आले.
तसेच 669 ठिकाणी 212.07 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडी पेक्षाही जास्त क्षेत्राचा विमा उतरविण्यात आल्याचे समोर आले. असे एकुण सुमारे एक हजार 274.38 हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविण्यात आल्याचे आढळून आले. प्रत्यक्षात मात्र फळबाग नसल्याचे तपासणीत दिसले. फळबागांच्या विम्या हप्त्यापोटी राज्य शासनाने 44 लाख 72 हजार तर केंद्र शासनाने देखील 44 लाख 72 हजार असे एकूण 89 लाख 44 हजार रूपये विमा कंपन्यांना भरले होते. आता हा प्रकार उघडकीस आल्याने विम्यासाठी हे बोगस क्षेत्र रद्द होणार असून त्यामुळे शासनाचे 89 लाख 44 हजार रूपयांची बचत होणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोराळे यांनी सांगितले.
कुठे…किती ?
तालुकानिहाय अर्जदारांची संख्या व कंसात हेक्टरी क्षेत्र पुढीलप्रमाणे : नगर 386 (210.18), श्रीगोंदा 288 (102.91), पाथर्डी 498 (200.88), राहाता 170 (91.30), कर्जत 296 (127), जामखेड 55 (22.47), संगमनेर 387 (165.47), पारनेर 223 (91.38), कोपरगाव 234 (139.45), राहुरी 34 (19.4), नेवासा 56 (37.7), शेवगाव 22 (10.30), अकोले 48 (43.76), श्रीरामपूर 27 (13.17).