Tuesday, September 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसिन्नर नगरपरिषदेत १५ प्रभागांतील ३० जागांपैकी १५ जागा महिलांसाठी राखीव

सिन्नर नगरपरिषदेत १५ प्रभागांतील ३० जागांपैकी १५ जागा महिलांसाठी राखीव

सिन्नर | प्रतिनिधी Sinnar

- Advertisement -

नगरपरिषदेच्या लवकरच होणार्‍या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महिलांच्या जागा निश्चित करण्यासाठी बुधवारी (दि.८) नगरपरिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात नगरसेवक पदाच्या एकूण ३० जागांपैकी १५ जागा महिलांसाठी चिठ्ठ्यांद्वारे आरक्षित करण्यात आल्या.

पाटबंधारे विभागाचे भूसंपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अभिजित नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोडतीच्या वेळी व्यासपीठावर प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी प्रदीप बांगर, मुख्याधिकारी अभिजित कदम, उपमुख्याधिकारी दीपक बंगाळ उपस्थित होते. या निवडणुकीसाठी १५ प्रभागांतून प्रत्येकी दोन असे एकूण ३० नगरसेवक निवडणून द्यायचे असून त्यातील ५० टक्के अर्थात १५ जागा महिलांसाठी राखीव असणार असल्याचे मुख्याधिकारी कदम यांनी जाहीर केले. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती प्रवर्गासाठी तीन जागा आरक्षित करण्यात आल्या. त्यातील दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या.

सर्वाधिक लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने प्रभाग तीन, चार व सात या प्रभागांतील प्रत्येकी एक जागा अनुसूचित जातीसाठी राखीव झाली. त्यातील प्रभाग तीनमधील एक व प्रभाग चारमधील एक या दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या. सर्वाधिक लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने सहा व १५ हे प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले. त्यातील प्रभाग सहामधील एक जागा चिठ्ठीद्वारे महिलांसाठी राखीव झाली.

अनुसूचित जाती व जमातीसाठी आरक्षित झालेले पाच प्रभाग वगळता उर्वरित १० प्रभागांतून इतर मागास प्रवर्गासाठी आठ प्रभाग चिठ्ठीद्वारे निश्चित करण्यात आले. त्यात प्रभाग दोन, पाच, नऊ, १०, ११, १२, १३, १४ या प्रभागांतील प्रत्येकी एक जागा इतर मागास प्रवर्गासाठी राखीव झाली. त्यातील दोन, नऊ, १० व ११ या प्रभागांतील प्रत्येकी एक जागा महिलांसाठी राखीव झाली. त्यानंतर सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातील महिलांचे आठ प्रभाग चिठ्ठीद्वारे निश्चित करण्यात आले. त्यानुसार प्रभाग एक, पाच, सात, आठ, १२, १३, १४, १५ यातील प्रत्येकी एक जागा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाली, तर उर्वरित एक, दोन, तीन, चार, सहा, आठ, नऊ, १० व ११ या प्रभागातील प्रत्येकी एक जागा खुल्या (सर्वसाधारण) गटासाठी राखीव झाली.

आरक्षण सोडतीला जिल्हा परिषदेचे माजी सभापती अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंढे, गोविंद लोखंडे, शैलेश नाईक, माजी नगरसेवक हर्षद देशमुख, किरण कोथमिरे, किरण मुत्रक, अशोक जाधव, पंकज मोरे, सोमनाथ पावसे, संतोष शिंदे, सुनील कानडी, अनिल वराडे, बाळासाहेब कमानकर, उदय गोळेसर, यतीन भाबड, बळवंत जाधव, मुजाहिद खतिब, विजय वरंदळ, पीराजी पवार यांच्यासह सर्वच राजकीय पक्षांचे इच्छुक उपस्थित होते.

२०११ च्या जनगणनेवर आरक्षण
या निवडणुकीसाठी सन २०११ च्या जनगणनेनुसार असलेली लोकसंख्या गृहीत धरून प्रभागांची संख्या निश्चित करण्यात आली. सन २०११ च्या जनगणनेनुसार सिन्नर शहराची लोकसंख्या ६५,२९९ होती. त्यात अनुसूचित जातीची लोकसंख्या ५५९३ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ४५१७ होती. प्रत्येक प्रभागात दोन याप्रमाणे १५ प्रभागांतून ३० नगरसेवक मतदारांना निवडून द्यायचे आहेत. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव आहेत. त्यामुळे १५ जागा या महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातीसाठी तीन जागा आरक्षित झाल्या. त्यातील दोन जागा महिलांसाठी राखीव झाल्या. अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आरक्षित झाल्या. त्यातील एक जागा महिलांसाठी राखीव झाली. इतर मागास प्रवर्गासाठी २७ टक्के अर्थात आठ जागा राखीव झाल्या. त्यातील चार जागा महिलांसाठी राखीव झाल्या. सर्वसाधारण गटासाठी १७ जागात राखीव झाल्या. त्यातील आठ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.

शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते निघाल्या चिठ्ठ्या
तेजस बाळासाहेब वाघ, सार्थक गायकवाड, समयरा शेख या तिघांच्या हस्ते आलटून-पालटून बरणीतून चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित करण्यात आले. यापूर्वी सिन्नर नगरपरिषदेसाठी २९ नगरसेवक व थेट जनतेतून नगराध्यक्ष अशा ३० जागा होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत नगरसेवकांच्या जागा ३० झाल्या आहेत, तर थेट जनतेतून येणार्‍या नगराध्यक्षामुळे सभागृहातील सदस्यांची संख्या ३१ होणार आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; वाचा भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5000 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची (Onion) मंगळवारी राहाता...